वर्षभरात सिव्हील रुग्णालयात २७०० प्रसूती सुरळीत

ठाणे: कोरोना काळात आणि सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतराच्या दिवसातही तब्बल २७०० प्रसूती करण्यात आल्या. यापैकी ९० टक्के प्रसूती अतिशय जोखमीच्या होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयात दर महिना सरासरी २०० ते ३०० महिलांची प्रसूती होते. त्यापैकी ८० ते ९० टक्के प्रसूती जोखमीच्या असतात, असेही सांगण्यात आले.

“सिव्हिल”मध्ये दाखल केलेल्या गर्भवती महिलांची प्रसूतीच्या काळात योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते, अशी माहिती ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ व ठाणे शहरसह पालघर जिल्ह्यात दूरवर पोहचली. स्थानिक दुर्गम आदिवासी, ग्रामीण आणि शहरी गर्भवतीना प्रसूतीकरीता ‘सिव्हिल’मध्ये दाखल करण्यात येते. कुटीर रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्रसूती रुग्णालय यासारख्या सर्व शासकीय रुग्णालयातील सर्व उच्च जोखमीच्या गर्भवती रुग्णांना योग्य व्यवस्थापन आणि उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते आणि या सर्व रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये योग्य काळजी घेतली जाते.

प्रसूतीच्या काळात बाळ आणि आईला धोका निर्माण झाल्यास प्रसूती सुखरूप होण्यासाठी सिव्हिल रुग्णालय उत्तम पर्याय असतो. विशेष करून जिल्ह्यात कुटीर ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागातही प्रसूती करण्यात येते. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२२ ते आत्ता पर्यत सुमारे तीन हजार शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत,असे स्त्री रोग तज्ञ डॉ. सचिन घोलप यांनी सांगितले.

येत्या महिन्यात सिव्हील रुग्णालय स्थलांतरच्या धावपळीत प्रसूती विभाग गर्भवती महिलांची योग्य ती काळजी घेणार आहे. अशातच खाजगी प्रसूतिगृहात गर्भारपणात होणारा खर्च सर्वाना परवडणार नसल्याने सर्वसामान्य घरातील गर्भवती महिलाही सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी हमखास येतातआणि गर्भवती महिलेला प्रसूतीच्या काळात जोखमीचा प्रसंग उदभवल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिव्हील रुग्णालय वर्षभरात २६४४ प्रसूती झाल्या आहेत. यापैकी १३७८ सिझर आणि १२६६ नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. तर १७८१ महिलांनी कुटूंब नियोजन केले आहे, असे डॉ. सचिन घोलप (स्त्रीरोग तज्ञ सिव्हील रुग्णालय) म्हणाले.

ठाणे आणि पालघर येथे झालेल्या प्रसूतीनंतर आई आणि बाळाची योग्य ती काळजी घेत विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी घेत असतात. या सिव्हील रुग्णालयाचे भूमिपूजन झाले आहे. वागळे इस्टेट येथे आरोग्य विभागाच्या शासकीय इमारतीत प्रसूतिगृह बांधले आहे. या ठिकाणी नवजात अर्भकांसाठी असणाऱ्या अतिदक्षता विभागात एनआयसीयू तर मोठ्या मुलांसाठी पीआयसीयूची सोय करली जाणार आहे, असे डॉ. पवार म्हणाले.