चिंताग्रस्त कामगाराची आत्महत्या

कल्याण : नियमित काम करुनही वखार मालकाने १६ महिन्याचा पगार न दिल्याने चिंताग्रस्त कामगाराने वखारीतील एका कोपऱ्यात शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या कामगाराच्या डोक्यावर कर्ज होते. ते फेडण्यास पैसे नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. कैलास अहिरे असे कामगाराचे नाव आहे. ते डोंबिवलीत आयरे गाव परिसरात राहत होते. कैलास कल्याणजवळील शहाड येथील बंदरपाडा भागातील एका लाकडाच्या वखारीत काम करत होते. नियमित काम करुनही वखार मालक वेतन देत नसल्याने घरगाडा कसा चालवायचा असा प्रश्न कैलाससमोर होता. याशिवाय त्याने कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते थकत होते. मित्र परिवाराकडून उसनवारीने पैसे घेऊन कैलास घरगाडा चालवत होते. मालकाकडे वेतन मागितले की तो फक्त आश्वासन देत होता. वेतन मिळत नाही हे घरी कसे सांगायचे असा प्रश्न कैलाससमोर होता.

मालकाकडे सतत तगादा लावूनही वेतन मिळत नाही, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, उसनवारीचे पैसे परत कसे करायचे असे प्रश्न कैलाससमोर उभे राहिल्याने त्याने वखारीच्या एका कोपऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत वखारीतील घटनाक्रम लिहिला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी कैलास यांचा मुलगा यशवंत याने तक्रार केली आहे. पोलीस चौकशी करत आहेत.