विकासकामांना अल्टिमेटम; कोंडीमुक्त रस्त्यांसाठी दम!

मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना निर्देश

मुंबई: ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डे आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सेवा रस्त्यांवर उभ्या वाहनांवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. शनिवारी रात्री झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस, वाहतूक, पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हातघाई सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात

सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे. परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तत्काळ एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारीगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देतानाच त्याच्या दुभाजकादरम्यान झाडे लावण्याचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने बांबूच्या सहाय्याने सुशोभित करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

सेवा रस्त्याचा थांब्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख-वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे तसेच घोडबंदर मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सेवा रस्त्याचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी तसेच बसेस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारीगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती महामार्गालगतचे जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा असे निर्देश दिले.

निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई

कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे आपल्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.