ठाणे: सध्या विकासकामांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीतून वाट काढत इच्छितस्थळी वेळेत पोहोचण्यासाठी शिळफाटा येथे वाहन चालकांनी स्वीकारलेला मार्ग धोकादायक होता.
कल्याण-शीळ रोडवर सकाळ सायंकाळच्या सुमारास देसाई गाव, कटई नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास देसाई गाव परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही लोकांनी चक्क विरुद्ध दिशेने दुचाकी नेल्या.
कल्याण शीळ रोडवर असलेल्या देसाई गावाजवळ रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या भल्या मोठ्या पाईपमधून दुचाकी चालवल्या. हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.