तिघांना न्यायालयीन कोठडी
ठाणे : सामान्य नागरिकांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवणा-या त्रिकुटाला ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी अटक करण्यात आली आहे. हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत.
रोहन एंटरप्रायजेस या कंपनीमध्ये एकूण ७६ गुंतवणूकदारांनी तब्बल १ कोटी ५५ लाख रुपये गुंतवल्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. संतोष कांगणे, आनंद जाधव आणि रवी तरे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
राहिश गिरीश मजिठिया हे ठाणे पूर्वेला चेंदणी कोळीवाडा राहतात. त्यांना मार्च २०२३ मध्ये आनंद जाधवने संपर्क साधला आणि रोहन एंटरप्रायजेसमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने १० महिन्यात दीड लाख रुपये मिळतील असे आश्वासन दिले. तसेच त्यांची रक्कम क्रिप्टो करन्सी आदी कंपन्यांमध्ये गुंतवत असून, त्यामधून मिळणा-या फायद्यातून परतावा दिला जात असल्याचे सांगितले. कंपनीमध्ये बराच कर्मचारी असून, वेगवेगळे फंड मॅनेजर असल्याचे सांगण्यात आले. कंपनीचे कार्यालय लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये असल्याची माहिती मजिठिया याला देण्यात आली. त्याला आणखी रक्कम पटीमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवण्यात आले.
कंपनीचे मालक कांगणे, फंड मॅनेजर रवी तरे आणि जाधव स्वत: संचालक असल्याचे मजिठियांना सांगण्यात आले. आकर्षक परताव्याच्या आमिषामुळे मजिठियांनी दोन लाख रुपये व त्यांच्या मित्रांनीही प्रत्येकांनी एक लाख रुपये गुंतविले. त्यानंतर काही दिवसांनी आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आले. मजिठिया व त्यांच्या मित्रांंनी पैसे मागितल्यावर त्यांना नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याची खात्री मजिठियाला झाल्यामुळे त्यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यांची तत्काळ दखल घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिमियमानुसार नोंदवण्यात आला आहे.
‘रेहान’मध्ये २२०० गुंतवणूकदारांनी गुंतवले ६४ कोटी
कंपनीच्या कमला मिल कंपनी येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. तपासाच्या दरम्यान रोहन एंटरप्रायजेस ही कंपनी रेहान एंटरप्रायजेस ही कंपनी निगडीत असल्याचे आढळले आहे. रेहान एंटरप्रायजेस कंपनीमध्ये तब्बल २२०० गुंतवणूकदारांनी सुमारे ६४ कोटी रुपये गुंतवल्याचे आढळून आले आहे. ‘रेहान’चे पाच साथीदार फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.