ठाण्यातील टोळी दरोड्यासाठी बार्शीत

तिघे पोलिसांच्या तावडीत

सोलापूर : बार्शी शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीने हत्यारे सोबत घेऊन निघालेल्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत कारमधून आलेल्या पाच जणांपैकी तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले तर दोघे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले.

बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर सोमवार, १७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेच्या दरम्यान एका हॉटेलजवळ वाहन अडवून संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश जाधव यांनी बार्शी शहर पोलीसात फिर्याद दिली असून संजय भागवत (रा.कल्याण जि .ठाणे), सुरेश विश्वकर्मा, सागराज भेटवाल (दोघे रा.उल्हासनगर जि. ठाणे) आणि इतर दोन साथिदार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोमवारी रात्री बार्शी शहर पोलीस पथकाची रात्री गस्त सुरू होती. बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावरुन एक कार (एम. एच. ४७ / के. ९८३१) ही थांबलेली दिसली. संशय येताच पोलिसांचे पथक कारच्या दिशेने गेले. मात्र त्यांना पाहून संशयित कारमधून बाहेर पडले आणि पळत सुटले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. या पाठलागात तिघेजण सापडले तर दोघे अंधारातून पसार झाले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी कार जप्त केली. तसेच मिरची पावडर आणि दरोडा टाकण्यासाठी आणलेली हत्यारे जप्त केली आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोडरमल करत आहेत.

या प्रकरणात अटक केलेल्या तीनही संशयित आरोपिंना बार्शीतील न्यायालयात हजर केले असता न्यायधीश जे. ए. झारी यांनी त्यांना शुक्रवार, २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.