ठाणे : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्बंधाला न जुमानता अजूनही येऊरमधील प्रवेश थांबलेला नसून पार्ट्या, डीजे, टर्फ, ढाबे आणि हॉटेल सारे काही सुरूच असल्याचे दिसत आहे.
रात्री ११ नंतर येऊरमध्ये प्रवेश बंदी करण्यासोबतच यापुढे रात्री ११ नंतर विद्युत रोषणाई तसेच ध्वनी प्रदूषण करण्यावर बंदी घालण्यात आली असून ११ नंतर कोणतेही समारंभ होणार नाहीत याची जबाबदारी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे आदेश दिले आहेत. मात्र या बंदीच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना वनविभागाची मात्र दमछाक होत आहे. परतीच्या वाटेवर प्रवेशद्वारावर पहाऱ्यासाठी उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत प्रवेशद्वार उघडायला लावण्याचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. येऊरमधील हे गैरप्रकार थांबवण्याची जबाबदारी केवळ वन अधिकाऱ्यांची नसून ही जबाबदारी पोलिसांवरही सोपवण्यात आली असताना पोलिसांचे मात्र यासाठी पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने प्रवेशद्वारावर संघर्ष निर्माण होत आहे.
येऊरमधील हॉटेल्स आणि अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बंगले हे सध्या चचेर्चा विषय ठरले आहेत. येऊर येथील दिवसरात्र सुरु असलेल्या हॉटेल आणि वाढत्या ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर स्थानिक आदिवासींनी देखील याविरोधात आवाज उठविला आहे. येथे रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, डीजेचा आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू व अम्ली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंगमुळे येऊरचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावर स्वतः वनमंत्र्यांकडून रात्री ११ नंतर प्रवेश बंदीचे आदेश निघूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पार्ट्या सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.