उल्हासनगर: गतवर्षी उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यावसायिक पाणी बिलाची सहा कोटी 34 लाख रुपयांची विक्रमी वसूली केली आहे. यासोबतच दुकानात अनधिकृत नळजोडणी घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 14 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील सर्व वर्षाचे विक्रम मोडीत काढणारी ही भरीव कामगिरी आयुक्त अजीज शेख,पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसूली अधिकारी विजय मंगलानी यांनी केली आहे.
यापूर्वीच्या 20 वर्षात व्यावसायिक पाण्याच्या वसूलीची सर्वाधिक आकडेवारी ही चार कोटी 12 लाख रुपये होती. ती यावर्षी दोन कोटी 22 लाखाने वाढून सहा कोटी 34 लाख झाल्याने आयुक्त अजीज शेख यांनी विशेष वसूली अधिकारी विजय मंगलानी यांची पाठ थोपटली आहे.
शहरात लहानमोठे कारखाने, दुकाने, गॅरेज, यांच्या व्यतिरिक्त हॉटेल, रेस्टॉरंट, बार, लॉजिंग बोर्डिंग, लग्नाचे हॉल, लॉन्स अशा चार हजार व्यापाऱ्यांना व्यावसायिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यातील बऱ्याच व्यापाऱ्यांनी अभय योजनेलाही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ.सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी विजय मंगलानी यांनी व्यावसायिक पाण्याचे बिल भरत नसणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नळजोडण्या कट करण्याचा पवित्रा हाती घेताच प्रतिसाद मिळाला आणि व्यावसायिक पाणी बिलाची विक्रमी वसूली झाली.