शिवसेना पदाधिकाऱ्यांविषयी खोटी माहिती देऊन बदनामी

दिवा भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

ठाणे: फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर टाकलेला संदेश आपल्यालाच उद्देशून लिहीला आहे, असा चुकीचा समज करून दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शिवसेना दिवा शहर व शिवसेना दिवा उपशहर प्रमुख ॲड.आदेश भगत यांच्या विषयी खोटी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ एप्रिल रोजी दिव्यातील सोशल मीडियावर बंटी और बबली या काल्पनिक जोडीविषयी मजकूर वायरल करण्यात आला होता. सदर मजकुरात भाजपने केलेल्या आंदोलनाचा कोणताही थेट उल्लेख करण्यात आला नव्हता तसेच कुठल्याही पक्षाचा आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. सदर संदेशामध्ये बंटी और बबली या काल्पनिक ठग जोडीविषयी लिहिण्यात आले होते. बंटी और बबली नावाची ही जोडी ब्लॅकमेलर आहे, लोकांना पैशाचा गंडा घालणारी आहे व अधिकारी, व्यावसायिक व नेत्यांना त्यांच्या विरोधात वर्तमात पत्रात खोटी माहिती देण्याची धमकी देऊन पैसे उकळणारी आहे अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला होता. असे असताना वायरल झालेला संदेश आम्हालाच उद्देशून लिहिण्यात आल्याचा गैरसमज करून दिवा भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शिवसेना दिवा शहर व शिवसेना उपशहर प्रमुख आदेश भगत यांच्याविरोधात खोटी माहिती पत्रकारांना देऊन सोशल मीडियावर त्यांची बदनामी करण्याचे काम केले होते.

मी कोणत्याही पक्षाचा, पदाधिकाऱ्यांच्या नावाचा, आंदोलनाचा व महिलांचा अपमान करणारी पोस्ट टाकलेली नसताना माझ्या नावाचा उल्लेख करून तसा मजकूर सोशल मीडियावर टाकून व खोटी माहिती पत्रकारांना पुरवून बदनामीकारक बातमी छापून आणली व ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. मी त्यासंदर्भात तक्रार केल्याने पोलिसांनी सर्व माहिती तपासून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यासाठी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, अशी माहिती आदेश भगत यांनी दिली.