कोकणपेक्षा परराज्याच्या हापूसची आवक वाढली

नवी मुंबई : दरवर्षी बाजारात एप्रिल महिन्यात कोकणच्या हापूस आंब्याची आवक वाढून हंगाम जोर धरतो. मात्र यंदा लहरी वातावरणाचा हापूस उत्पादनाला जबर फटका बसला असून सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईतील वाशी बाजारात कोकणातून अवघ्या पंचवीस ते तीस हजार पेट्या दाखल होत आहेत. या उलट परराज्यातील आंब्यांची आवक वाढत चालली आहे. आवक घटल्याने दर अजूनही चढेच असून दोन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत भाव पेटीला आहे.

मागील महिन्यात हापूस आंब्याचा जास्त खप होणाऱ्‍या वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोकणातील आंब्याची आवक घटली आहे. मात्र कर्नाटकसारख्या परराज्यातून हापूस आंब्याची आवक वाढलेली आहे. याबरोबरच अन्य आंबेही अधिक येत आहेत. अन्य आंब्यांची आवक वाढल्यामुळे दरांच्या स्पर्धेत हापूस कमी पडतो. सध्या चार ते पाच डझनच्या दर्जेदार हापूसला साडेचार हजार रुपये दर मिळत आहे. हा दर मार्चच्या अखेरीस चार हजार रुपयांपर्यंत आला होता. आवक कमी होऊ लागल्यावर पाचशे रुपयांची वाढ झाली.

लहरी हवामानामुळे आंब्याला आलेला मोहर गळून गेला. काही ठिकाणी अवकाळी पाऊस, उष्णतेमुळे आंबाच गळून गेला. त्यामुळे ऐन हंगामात हापूस आंबा कमी पडणार असून मे महिना अखेरीस आंबा उपलब्ध होणार आहे. तोही अत्यंत कमी राहील अशी शक्यता आहे.

सोमवारी बाजारात कोकणातील ३१०९० पेट्या तर इतर राज्यातील ४८४९६ पेट्या दाखल झाल्या होत्या. तुलनेत कोकणातील आवक कमी असल्याने दर अजूनही चढेच असून चार ते पाच डझन पेटीला २००० ते ४५०० दर आहे. परराज्यातील आंबा ८० ते १४० रू.प्रतीकिलो विकला जात आहे, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.