ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये १०, २० आणि ३० वर्षाच्या तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आली आहे.
शासन निर्णयाला अनुसरून याबाबतचे अध्यादेश ठाणे महापालिकेने जारी केल्याने ज्यांच्या सेवेची १० वर्षे पूर्ण झाली, त्यांना पुढील वेतनश्रेणीचा लाभ दिला जाणार असून पालिकेच्या ६,७०६ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात एकुण तीन वेळा लाभ मिळणार आहेत.
याआधी सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षानंतर पहिला, २४ वर्षांनंतर दुसरा आणि ३६ वर्षांनंतर तिसरा लाभ दिला जात असे. दरम्यान, कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना मात्र ही योजना अनुज्ञेय नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचा निर्णय घेतला. या धर्तीवर ठाणे महापालिकेतील कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांना तीन लाभांची योजना लागु करण्यात आली आहे. सध्या महापालिकेत वर्ग एकचे १७६, वर्ग दोनचे १५५, वर्ग तीनचे २,३६५ आणि वर्ग चारचे ४,०१० असे एकुण ६,७०६ इतके मनुष्यबळ आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळात १०, २० आणि ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून अंमलात आणली आहे. या योजनेत लाभार्थीला पदोन्नतीसाठी असलेली विहीत अर्हता, ज्येष्ठता तसेच अन्य प्रलंबित न्यायिक आणि विभागीय चौकशीची प्रकरणे नसावीत, असे बंधनकारक केले आहे. यापूर्वी पहिला आणि दुसरा लाभ घेतलेल्यांना प्रकरणपरत्वे या योजनेतील पहिला आणि दुसरा लाभ समजण्यात येणार आहे. पूर्वी १२ व २४ वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ सातव्या वेतन आयोगात १०, २० आणि ३० वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार दिले जाणार आहेत. यामुळे या सर्वांचा दोन वर्षांचा फायदा होणार आहे.
ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेची १० वर्षे ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी किंवा याच दिवशी पूर्ण होतील, त्यांना, या योजनेअंतर्गत पहिला लाभ १ जानेवारी २०१६ रोजी होईल. ज्यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर १ जानेवारी २०१६ पूर्वीच पहिला लाभ मंजूर केला आहे, अशांना त्यांची १२ अधिक आठ अशी २० वर्षांची सेवा, ही १ जानेवारी २०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, त्यांना दुसरा लाभ १ जानेवारी २०१६ पासून मिळणार आहे. यानुसार,ज्यांची २० वर्षाची सेवा १ जानेवारी २०१६ रोजी आणि नंतरच्या तारखेस पूर्ण होईल, त्यांना, तिसरा लाभ हा दुसऱ्या लाभापासून १० वर्षानंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पात्रतेनुसार मंजूर करण्यात येणार आहे.