गुन्हेगारी आणि प्रदूषणाची पोलखोल करणार स्मार्ट पोल

नवी मुंबई: स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात  दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी सोबतच शहरातील प्रदूषण  पातळीत देखील वाढ होत आहे. या दोन्हीवर आता स्मार्ट पोलद्वारे लक्ष असणार असून त्याची नोंद ठेवली जाईल. यासाठी प्रायोगिक तत्वावर शहरात दोन स्मार्ट पोल उभारले आहेत.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात गुन्हेगारी, चोऱ्यांचा आणि प्रदूषणाचा आलेख वाढतच चालला आहे. याचा मानवी जीवनावर आणि आरोग्यावर असा दुहेरी आघात होतो. त्यामुळे यावर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पाऊल उचलले आहे.

वायरलेस नेटवर्क, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारे आणि प्रदूषणाला आळा घालणारे सेन्सर यांचा समावेश असलेल्या तंत्रज्ञानाभिमुख वैशिष्ट्यांची अंमलबजावणी करून शहराचा कायापालट करण्यासाठी विविध प्रमुख ठिकाणी स्मार्ट पोल बसवण्याची योजना नवी मुंबई महानगरपालिकेने आखली आहे. या स्मार्ट पोलमध्ये वायफाय उपकरणांद्वारे डेटा सुलभता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरेल. गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरेही असतील. यात तापमान आणि वायू प्रदूषणाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर देखील बसवले जातील. गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पॅनिक बटण दाबले की परिसरातील पोलिसांना त्याचा अलर्ट होईल. त्यामुळे या स्मार्ट पोलने शहरातील गुन्हेगारी आणि प्रदूषण अशा दोन्हींची पोलखोल होणार आहे.

——————————————–

नवी मुंबईत प्रायोगिक तत्वावर असे दोन स्मार्ट पोल बसवले आहेत.त्यांची यशस्वी चाचणी पूर्ण झाल्यानंतर  शहरभर त्याची पुढील अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल.

शिरीष आरदवाड,

अतिरिक्त शहर अभियंता,विद्युत.