मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी शहर उपक्रमांनी गजबजले
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहरात बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाण्यात आले होते. एकूणच ठाणे शहर गुरुवारी ‘नाथ’मय झाले होते.
एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील आनंदआश्रमात जाऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. आनंद आश्रम येथे संतती या रुग्णालयाने 4 ते 9 फेब्रुवारी दरम्यान गरजू दाम्पत्यासाठी मातृत्व शिबिराचे आयोजन केले होते (आयव्हीएफ) यामधील तीन जोडप्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढून पूर्ण मोफत उपचार केले जाणार आहेत. तीन जणांना ५० टक्के सवलत आणि तीन जोडप्यांना ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याची लॉटरी यावेळी काढण्यात आली.
ठाण्यात सुमारे चार ते पाच दिवसांपासूनच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांची लगबग सुरू होती. बुधवारी रात्रीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील शुभ दीप या निवासस्थानी आणि निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात पुष्पहारांनी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे हे पुष्पहार आकर्षणाचा विषय ठरत होते. मुख्यमंत्री यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री १२पासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. शिंदे हे बुधवारी रात्री बारा वाजता निवासस्थानी दाखल झाले. याचदरम्यान बंगल्याबाहेरच कार्यकर्त्यांना भेटत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्यात येऊन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनामार्फत आरोग्य तपासणी, रक्तदान, लसीकरण आणि मोतीबिंदू तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी धान्यवाटप, क्रिकेटचे साहित्य, नऊ रुपयांमध्ये नऊ खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवली होती. पाणीपुरीचे मोफत वाटप केले. तर तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा येथील आहेत. त्यामुळे सातारा येथून आलेल्या काही जणांनी सव्वा किलोचा कंदी पेढ्यांचा हार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी घेऊन आले होते. नांदेड जिल्ह्यातून शिंदे यांच्यासाठी काही कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार भेट म्हणून आणला होता. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून हा २१ किलोचा हार बनवण्यात आला होता.
ठाण्यातील किसननगर येथून एकनाथ शिंदे यांनी राजकीय कार्याची सुरूवात केली होती. त्यामुळे दरवर्षी ते वाढदिवसानिमित्ताने किसननगर येथे जात असतात. गुरुवारी सकाळी त्यांनी किसननगर येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिंदे यांनी येथील शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी किसननगर येथील शाखेलाही भेट दिली. तेथील काही कार्यक्रमाचेही उद्घाटन केले. त्यांनी परिसरात लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. याचदरम्यान त्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले.