* १३,२०० कोटींचा सुधारित खर्च
* १२० वर्षांचे आयुष्य
* २० मिनिटांत कापणार अंतर
ठाणे : हजारो कोटी रुपये मुल्यांचा ठाणे बोरिवली भूमिगत मार्ग अखेर मार्गी लागणार असून, विविध प्रकारच्या बांधकामांसाठी निविदा जारी करण्यात आली आहे. या बोगद्याच्या अस्तरांच्या डिझाईनचे आयुष्य तब्बल १२० वर्षे असणार असून ठाणे-बोरिवली अंतर २० मिनिटांत कापले जाणार आहे. या प्रकल्पाची सुधारित किंमत 13,200 कोटी रुपये आहे, अशी माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.
बोगद्याच्या बांधकामांकरीता निविदा जारी झाल्यानंतर आणि त्याची संपूर्ण पूर्तता झाल्यावर पावसाळ्यात कामाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ठाणे-बोरिवली दरम्यानचे अंतर केवळ वीस मिनिटात पार करता यावे यासाठी प्राधिकरणाने हाती घेतलेला 11.8 किलोमीटर लांबीच्या ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
सहा-सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीएने बांधकामांसाठी निविदा जारी केल्या आहेत. ती निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यात कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ठाण्याहून बोरीवलीला जाण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आणि हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला होता. महामंडळाने प्रकल्प हाती घेतला. परंतु, माशी शिंकली आणि पाच वर्षात हा प्रकल्प एमएसआरडीसीला मार्गी लावता आला नाही, असे प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
अखेर 2021 मध्ये राज्य सरकारने हा प्रकल्प प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला. परंतु, हा मार्ग जंगलातून जाणार असल्याने पर्यावरण वन्य जीवनांना धोका पोहोचू शकतो, हे लक्षात आल्यामुळे राज्य सरकारने प्रकल्पाविषयी पुन्हा अभ्यास करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले.
अभ्यासाच्या अंती तयार केलेल्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ गेला आहे. संबंधित कामे रेंगाळली असूनही, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी प्राधिकरणाने निविदा जारी केल्या. एमएमआरडीच्या निवेदेनुसार 11.8 किलोमीटरचा हा भूमिगत मार्ग आणि यातील 10.25 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे अशा महत्वाच्या कामांसाठी दोन विविध निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया येत्या तीन-चार महिन्यात पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे प्राधिकरणाचे नियोजन आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची शक्यता प्राधिकरणातील अधिका-यांनी व्यक्त केली.