अनेक गावांना मिळणार जलदिलासा
डोंबिवली : डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रातील डोंबिवली जिमखान्याजवळ असलेला जुना जीर्णावस्थेतील जलकुंभाला पाडून त्या ठिकाणी नवा जलकुंभ उभारला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जलकुंभाच्या जागी २० लाख लिटर क्षमतेचा एक ओव्हरहेड जलकुंभ आणि ५० लाख क्षमतेचा एक भूमिगत जलकुंभ बांधण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे एमआयडीसी आणि परीसरातील अनेक गावांना जलदिलासा मिळणार आहे.
डोंबिवली औद्योगिक परिसरातील डोंबिवली जिमखान्याजवळ असलेला २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. यामुळे जीर्णवस्थेत असलेला हा जलकुंभ पडून भविष्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी या जागी नवीन जलकुंभ उभारणे महत्वाचे होते. या जलकुंभातून एमआयडीसी विभाग आणि लगतच्या अनेक गावात पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र तो आता पूर्णपणे बंद असल्यामुळे सर्व परीसरात पाण्याची टंचाई जाणवत होती. याबाबत कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे या समस्येकडे लक्ष वेधले.
अत्यंत धोकादायक स्थितीत असलेला जलकुंभ पाडून त्या जागी अधिक क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्यां मार्गी लागून या नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.