ठाण्यात धावणार टीएमटीच्या इलेक्ट्रिक बसगाड्या

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी होणार लोकार्पण

ठाणे: ठाणे परिवहनच्या ताफ्यात आलेल्या ११ इलेक्ट्रिक बसगाड्यांचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी केले जाणार आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांच्या तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्के कपात केली जाणार असल्याची माहीती ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी दिली आहे.

परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रिक बस या वर्षी येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ११ बस दाखल होणार असून पुढील वर्षी देखील १२५ अशा २५०बस दाखल होणार आहेत. डिझेल आणि सीएनजीचे दर परवडत नसल्याने परिवहन सेवेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा वाढत आहे. इलेक्ट्रिक बसमुळे आर्थिक बोजा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोरिवली, मीरा-भाईंदर या भागात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस तिकिटाचे दर परिवहन समितीच्या परवानगीनंतर २० ते २५ टक्क्यांनी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास श्री. जोशी यांनी व्यक्त केला.

इलेक्ट्रिक बस दिवा ते नवी मुंबई, ठाणे ते रिव्हरवूड सोसायटी खारीगाव, पारसिक नगर, वाशी आणि दिवा ते डोंबिवली या नवीन मार्गावर धावणार असल्याची माहिती श्री. जोशी यांनी दिली. मागील दीड वर्षे परिवहन समिती आणि प्रशासनासह ठाणे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ या बसगाड्यांकरिता पाठपुरावा करत होते, त्याला यश आले आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. खा.डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित राहणार आहेत.

ठाणे पोलिसांनी मागील १७ वर्ष परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास केला आहे. त्याची १७ कोटी २१ लाखांची देणी अजूनही दिली नसल्याची खंत श्री.जोशी यांनी व्यक्त केली.