महिन्याभरात तीनदा जलवाहिनी फुटून कोपरीत पाणीटंचाईचे संकट

विकासकाच्या निष्काळजीपणाचा आरोप

ठाणे : कोपरीत ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी वारंवार फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असून येथील नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एका विकासकाच्या निष्काळजीपणामुळे ही जलवाहिनी फुटत असल्याचा आरोप भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी केला आहे.

ठाणे पूर्वेत कोपरी उप प्रभागातील इमारत क्र.१४, १५ आणि १६च्या पुनर्विकासाचे काम एका विकासकामार्फत सुरू असून या प्रकल्पालगत परिसरातील रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरवणारी जलवाहिनी रविवारी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे या रहिवाशांना आता काही दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी तीनवेळा फुटली असल्याची तक्रार राजेश गाडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. संबंधित विकासकाच्या निष्काळजीपणामुळे ही जलवाहिनी फुटत असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून नागरिकांना नाहक पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे श्री.गाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या विकासकावर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री.गाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांनाही निवेदन दिले आहे