कल्याण : पाच वर्षांच्या मुलाला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. आदर्श हिंदी हायस्कूलमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. या माराहणीत मुलाला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा मुलगा आई-वडिलांसह कल्याण पश्चिम परिसरातील चिकणघर परिसरात राहतो. पीडित मुलगा हा कल्याणमधील आदर्श हिंदी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगा वर्गातील एका मुलाबरोबर मस्ती करत होता. त्यामुळे संतापलेले शिक्षक अशोक तिवारी यांनी या पाच वर्षाच्या मुलाला हाताच्या चापटीने व छडीने बेदम मारहाण केली. तिवारी यांनी मुलाला इतके मारले की मुलाच्या तोंडावर, हातावर, पायावर मारहाणीचे व्रण उठले होते. मुलगा घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी त्याची अवस्था पाहिली. त्यांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले.
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात मारकुट्या शिक्षक अशोक तिवारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास सुरू आहे. याबाबत पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी मात्र काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.