चार बस जळून खाक
भाईंदर : वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या नालासोपारा आगारात भीषण आग लागून चार बसगाड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप उघड झाले नाही.
नालासोपारा पूर्वेकडील सनशाईन टाॅवरच्या लगत असलेल्या वसई-विरार महापालिका परिवहन डेपोतील बसला आग लागली. दुपारी १२ च्या सुमारास आगारात उभ्या असलेल्या एका बसमधील आसनाला आग लागली. त्या आगीने उग्ररुप धारण करीत जवळ उभ्या असलेल्या चार बसेसला विळखा घालत भीषण अग्नितांडव सुरू केले.
घटनेची खबर वसई-विरार महापालिका अग्निशमन विभागास मिळताच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणली. दुर्घटनेत चार बसेस जळून खाक झाल्या आहेत. याबाबत परिसरातील रहिवाशांनी आगारातील सुरक्षा व्यवस्थेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आगारात उभ्या असलेल्या बसेसबाबत ठोस सुरक्षा नसल्याने बसमध्ये परिसरातील गर्दुल्ले, नशेबाज व्यक्तींचा वावर असून त्यांनी वापरत असलेल्या साहित्यामुळे बसमधील आसनाला आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी आग दुर्घटनेचा अद्याप तपास सुरू असल्याने ठोस कारण व्यक्त करण्यात आले नाही. या प्रकरणी परिवहन अधिकारी व सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.