२७ महापालिकांमध्ये मीरा-भाईंदर अव्वल
ठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिकेने वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मूलभूत सेवा दिल्याने राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिकेने प्रथम स्थान पटकावले आहे.
२७ महापालिकांच्या सेवा, उपलब्धता, वेबसाईट, पारदर्शकता, सोशल मीडिया व मोबाईल ॲप्लिकेशन या सर्वेक्षणानुसार उल्लेखनीय गटात मीरा-भाईंदर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.
पुण्यातील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने राज्यातील शहरांच्या ई- गव्हर्नन्सबाबतच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला गेला. यात महाराष्ट्रातील 27 महानगरपालिका या निर्देशांकासाठी विचारात घेतल्या गेल्या. 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत महापालिकांच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप्लिकेशन, सोशल मीडिया हॅण्डल यांचा वापर विचारात घेतला गेला. यामध्ये महापालिकेच्या किती सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आहे का, महापालिकेने स्वतहून माहिती ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे का, महापालिकेची वेबसाइट, मोबाइल ॲप्लिकेशन वापरायला किती सुलभ आणि सोपे आहे आदी संबंधित विषयांची माहिती संकलित करून निर्देशांक काढण्यात आला आहे.
जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणा, झाडे तोडण्याची परवानगी, ऑनलाईन इमारत परवानगी प्रणाली, ऑनलाईन होर्डिंग्ज व बॅनर परवानग्या, गणेशोत्सवसंबंधी परवानग्या, परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, ऑनलाईन निविदा, ऑनलाईन आरटीआय अर्ज, ऑनलाईन आरटीएस (सेवेचा अधिकार) पोर्टल, घनकचरा वाहून नेण्याबाबत माहिती, तक्रार निवारण यंत्रणा व आपत्कालीन क्रमांक (अग्निशमन/वैद्यकीय/पोलीस) इत्यादी सेवा महापालिका वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या कारणाने मीरा-भाईंदर महापालिकेस 10 पैकी 8.03 गुण प्राप्त झाले असून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
वेबसाईट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून कामातील पारदर्शकता यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेशी बरोबरी साधून प्रथम स्थान पटकावले आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या सर्वेक्षणानुसार उल्लेखनीय गटात मिरा भाईंदर महानगरपालिकेने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन पटकावले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी महानगरपालिकाने सर्वेक्षणात घवघवीत यश मिळवल्याबद्दल माहिती व तंत्रज्ञान उपायुक्त संजय शिंदे, सिस्टीम मॅनेजर राज घरत व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच शहरातील नागरिकांनी वेबसाईट, महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवा, पारदर्शक कारभाराला उत्तम प्रतिसाद दिल्याने आयुक्तांनी शहरवासियांचे आभार मानले आहेत.