ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून दिवा डम्पिंग बंद होणार अशी आश्वासने देण्यात येत होती, मात्र त्याची परिपूर्ती होत नव्हती. मात्र उद्यापासून दिवा डम्पिंग शंभर टक्के बंद करण्याचे आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आले आहे. दिव्यात कचरा टाकण्याऐवजी आता हा कचरा भंडार्ली येथे टाकला जाणार असल्याचा दावा माजी नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.
दिवा शहरात डंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मागील वर्षी जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तयार झाले होते, तेव्हा डम्पिंग ग्राउड बंद झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. भंडार्ली येथे महापालिकेमार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी निधीही खर्च केला आहे. परंतु आजही दिवा शहरात मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्या चालू आहेत. याशिवाय ठाणे शहरातील कचरा दिवा शहरात आजही टाकला जातो. महापालिकेची आश्वासने ही निवडणुकीपुरती असतात का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला होता. पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका खेळत असल्याचा आरोपही यापूर्वी दिव्यातील विरोधकांकडून करण्यात येत होता.
ठाणे महापालिकेची मुदत संपली असून या ठिकाणी आता प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. मात्र पुन्हा एकदा दिवा डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले असून यावेळी मंगळवारपासून डम्पिंग शंभर टक्के बंद होणार असल्याची माहिती दिव्यातील माजी लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली आहे. यापूर्वी भंडार्ली या ठिकाणी घनकचऱ्याचा प्रकल्प सुरु करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मधल्या काळात काही तांत्रिक कारणांमुळे भंडार्लीचा प्रकल्प बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. आताही डम्पिंग बंद होणार कि नाही याबाबत प्रशासनाचे अधिकारी काही बोलायला तयार नसल्याने डम्पिंग बंद होणार की नाही याबाबत साशंकता आहे.