पार्ले टिळक विद्यालयाच्या संस्थांमध्ये मासिक मुखपत्र सुरु

तांत्रिक जबाबदारी ‘ठाणेवैभव’ आणि ‘केवायटी’कडे

ठाणे: मुंबईतील विलेपार्लेमधील शतकी परंपरा असणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाच्या शाळांमध्ये संस्थेने स्वतःचे मासिक मुखपत्र सुरु केले असून त्याचे प्रकाशन प्रजासत्ताकदिनी शाळा संचालकांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

या अभिनव उपक्रमात संस्थेच्या शाळांतील विद्यार्थी-शिक्षक यांचा सहभाग आहे. कोरोनामुळे मुलांच्या वाचन आणि लेखन या दोन गुणांवर विपरीत परिणाम झाला होता आणि या मुखपत्रामुळे या दोन्ही आघाड्यांवर मुलांना पूर्वस्थितीत आणण्याचा हेतू सफल होईल.
‘ठाणेवैभव’ आणि ‘नो युव्हर टाऊन’ यांनी या मुखपत्राची तांत्रिक जबाबदारी स्वीकारली असून संस्थेतर्फे सौ. जान्हवी खांडेकर या समन्वय साधण्याचे काम करीत आहेत.

ठाण्यातील सरस्वती विद्यालयात (राबोडी आणि घोडबंदर) ‘सरस्वी टाइम्स’चा उपक्रम तीन महिन्यांपूर्वी सुरु झाला आणि त्यास शिक्षक-विद्यार्थी आणि पालक यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पालकवर्गाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या (पीटीव्हीए) आठ शैक्षणिक संस्था आहेत. या सर्व संस्थांमधील घडामोडींचा परामर्श या मुखपत्रात घेण्यात येणार आहे.

विविध ठिकाणी झालेल्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष श्री.अनिल गानू (आयसीएसई), उपाध्यक्ष श्री.विनय जोग (इंग्रजी माध्यम), खजिनदार श्री. बन्सीधर धुरंधर (मराठी माध्यमिक), सचिव श्री. दिलीप पेठे (मराठी प्राथमिक), सह-सचिव श्री. हेमंत भाटवडेकर (मराठी प्राथमिक), सदस्य श्री. धनंजय साठ्ये, आणि सौ. जान्हवी खांडेकर (इंग्रजी माध्यमिक अंधेरी) उपस्थित होते.

‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आणि ‘केवायटी’च्या संचालिका सौ. जुईली कुलकर्णी हे विशेष अतिथी म्हणून या प्रकाशन समारंभास उपस्थित होते.