एक चौरस मीटर खड्डयामागे एक लाखाचा दंड
दर्जेदार रस्त्यासाठी आयुक्तांचा इशारा
ठाणे: आयुक्तांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आणखी कंबर कसली असून यापुढे रस्त्यावर खड्डा आढळल्यास ठेकेदाराला एक चौरस मीटरमागे एक लाखांचा दंड बसणार आहे. तर ठेकेदारासह संबंधित अभियंत्यावरही कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ६०५ कोटींचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रभागांमधील ११७ रस्त्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे जलद आणि दर्जेदार काम यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दर्जा वाढवण्याबाबत सर्व ठेकेदारांना आणि प्रशासकीय यंत्रणेला ताकीद दिली गेली आहे. निविदा भरताना तशी अटच घातली गेली आहे. त्यानुसार दहा वर्षांची गॅरंटी सर्वांनी मान्य केली आहे. ते म्हणाले की, या दहा वर्षात खड्डा पडला तर त्याच्या दुरुस्तीची केवळ जबाबदारी ठेकेदारावर नसेल. या कालावधीत खड्डा पडणारच नाही याची मुख्य जबाबदारी ठेकेदारांवर असेल. आणि दुर्दैवाने खड्डा पडलाच तर प्रत्येक चौरस मीटरमागे त्यांच्याकडून एक लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान खड्डा पडलाच तर प्रत्येक चौरस मीटरमागे त्यांच्याकडून एक लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान दंडाच्या भीतीने रस्ते दुरुस्तीचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा असल्याचे बांगर यांनी व्यक्त केली.
पाऊस पडल्यामुळे खड्डा पडत नाही तर पाणी साचल्यामुळे खड्डा पडतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल, अशा पद्धतीने रस्ते बांधण्याबाबत आग्रह असेल. दर्जाहीन काम झाल्यामुळेही खड्डे पडतात. त्यामुळे दर्जाच्या बाबतीत संपूर्ण यंत्रणेला ताकीद दिली असून थर्ड पार्टी ऑडीटही करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
रस्ते कामानंतर आयुक्त स्वतः त्याची पाहणी करतील. काम समाधानकारक दिसले तरच बील पास होईल. अन्यथा बील काढणार्यापासून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.