शिवसेना-धनुष्यबाणाचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात

आयोगापुढे आज सुनावणी
मुंबई: निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणाला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स मागील आठवड्यातही कायमच राहिला. यावर आता उद्या ३० जानेवारीला सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येण्याची शक्यता दिसत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत सांगितले होते, की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे पूर्ण सांभाळतील. तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा रहा आणि युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे, त्यामुळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले आहेत.
दोन्ही गटांना लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला असून ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. शिंदे व ठाकरे गटाने आपल्या दाव्यांच्या पुष्टय़र्थ लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आणि आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सादर केले आहेत.