मध्यंतरी एका शाळेतील युवकांशी (इयत्ता आठवी ते बारावी) संवाद साधण्याचा योग आला. अनौपचारिक गप्पातून मी या मुलांकडून ते शहराबद्दल कसा विचार करतात हे समजून घ्यायचे होते. मुलांची वये लक्षात घेता मी ढोबळमानाने त्यांना स्मार्ट सिटी संकल्पना माहीत आहे काय असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे नकारात उत्तर मिळाल्यामुळे मला धक्काच बसला. ज्या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या जीवनात लक्षणीय बदल होणार आहे आणि विशेष म्हणजे माझ्यासमोर बसलेल्या तथाकथित उद्याच्या नागरिकांनाच त्यांचा लाभ होणार आहे, असे असूनही ही मुले स्मार्ट सिटीबद्दल अनभिज्ञ होती!
मी गप्पांच्या ओघात ‘सिविक सेन्स’ अर्थात नागरी कर्तव्यांबद्दल विचारले. हा शब्द ते बहुदा प्रथमच ऐकत असावेत, असे मला दिसले. हा दुसरा धक्का होता, एरवी मी आजच्या तरुण पिढीवर टीका करून मोकळा झालो असतो. परंतु त्यांच्या जागी आणि अर्थात त्यांच्या वयाचा असताना मी कसा विचार करीत होतो याचा विचार केला आणि मी धक्क्यातून सावरलो. आपण आजच्या ‘टेक्नो सेव्ही’ पिढीपेक्षा थोडे मागासलेले होतो कारण सरकार, महापालिका या सार्वजनिक संस्थांच्या कार्याबद्दल आपणही तितकेच अनभिज्ञ होतो. मग त्यांना तरी दोष का द्या? आपण त्यांच्याकडून अति अपेक्षा तर बाळगत नाही ना, असा प्रश्न मनात डोकावून गेला. अर्थात आपल्या तरुणपणी मिळालेले स्वातंत्र्य, जगाकडे पाहण्याचा सीमित दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा आणि त्यातही समाज माध्यमांचा अभाव असे अडथळे होतेच की, त्या मानाने आजची पिढी अधिक ज्ञानी आहे. माहितीचे धबधबे त्यांच्यावर 24 बाय सात कोसळत असतात आणि तरीही मुले रोजच्या वापरातील हे शब्द कानी पडले नसल्याच्या अवस्थेत कसे काय हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. असो. हा लेख लिहिताना काही लक्ष्यवेधी माहिती माझ्या वाचनात आली. सप्टेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 34 टक्के लोक समाज माध्यमांचा वापर करीत आहेत. अजून दोन वर्षात म्हणजे 2025 अखेर हे प्रमाण दुप्पट होणार आहे. आज घडीला प्रत्येक भारतीय दररोज सरासरी दोन तास 27 मिनिटे इतका वेळ या माध्यमांवर घालवतो. डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार भारतात फेसबुकचे जवळपास 35 कोटी, इंस्टाग्रामचे 23 कोटी तर ट्विटरवर अडीच कोटी वापरकर्ते आहेत. या सगळ्यात व्हाट्सअप सर्वाधिक लोकप्रिय आहे. इतके सारे असूनही स्मार्ट सिटी, सिव्हीक सेन्स, शहराला भेडसावणाऱ्या समस्या याबाबत या मुलांचे काहीच मत का नसावे हा प्रश्न मला छळू लागला आहे.
तरुणांचा सहभाग असावा या अपेक्षेतून आपण त्यांच्याजवळ असलेल्या माहितीच्या संचिताचा विचार करायला हवा. समाज माध्यमांवर इतकी सक्रिय असणारी ही पिढी त्यांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयांबद्दल इतकी उदासीन कशी राहू शकते? हा प्रश्न मनात यायचे आणखी एक कारण असेही आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे ते असे की 25 जानेवारी 2011 रोजी घडलेल्या घटनेची. या घटनेत तरुणांचा सहभाग होता. आणि म्हणून आजच्या आपल्या पिढीशी तुलना करण्याचा मोह होतो. अरब राष्ट्रात या घटनेचे मूळ सापडते. डिसेंबर 2010 मध्ये ट्युनिशियामध्ये एका फेरीवाल्याने सरकारच्या विरोधात आत्मदहन केले. त्यातून 25 जानेवारी 2011 रोजी इजिप्तची राजधानी कैरो येथे तेहरीर चौकात उद्रेक झाला. या आंदोलनाचे नेतृत्व तरुणांनी केले होते. समाजमाध्यमे तेव्हा होती, भले आजच्या इतकी त्यांची व्याप्ती मोठी नसेल. परंतु या तरुणांनी त्याचा उपयोग केला होता. ‘अरब स्प्रिंग्स’ या नावाने ओळखले जाणारे आंदोलन जागृत तरुणाईचे प्रतीक म्हणून आजही ओळखले जाते. परिणामांची तमा न बाळगता हजारो तरुण रस्त्यावर उतरतात आणि तीस वर्षे सत्तेत असणाऱ्या होस्नी मुबारक यांना आव्हान देतात. अन्यायाविरुद्धचा हा एल्गार तेव्हाच उमटू शकतो जेव्हा आंदोलन करताना वास्तवाचे भान असते. त्यातून ते विचार करू लागतात. त्यांची मते ठाम होऊ लागतात. काय चूक काय बरोबर हे त्यांना उमगू लागते आणि त्यातून उडणारी ठिणगी आंदोलन पेटवून जाते.
भारतातील तरुणाई राजकीयदृष्ट्या जागृत झाली आहे. परंतु त्यांना समाजभान आहे असे म्हणता येईल काय? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही. ते होकारार्थी मिळवायचे असेल तर माझ्यासकट अनेकांना समाजातील संवेदनशील जिव्हाळ्याच्या आणि वास्तववादी प्रश्नांची फेरमांडणी करावी लागेल.