ठाणे: ठाणे शहरात आखण्यात आलेल्या क्लस्टरच्या युआरपी अर्थात (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मुळे प्रक्रियेत असलेल्या तब्बल १६ एसआरए योजनांना ब्रेक लागला आहे. या १६ प्रकल्पांमधील जवळपास एक हजारांपेक्षा अधिक पात्र झोपडीधारक कुटुंबांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे ४४ युआरपी नियोजित करण्यात आले आहेत. त्यातील पाच युआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. मात्र उर्वरीत युआरपी अद्यापही अंतिम झालेले नाहीत. परंतु आता पुनर्विकासाच्या छोट्या इमारतींना देखील क्लस्टर अडसर ठरत असल्याचे दिसत आहे. ठाण्याच्या विविध भागात धोकादायक झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासात अनेक अडथळे असतांना आता क्लस्टरचा देखील अडथळा ठरत आहे. एखादी इमारत पुनर्विकासासाठी काढली की त्यासाठी आता क्लस्टरचे ना हरकत प्रमाणपत्र आणा अशी अट घालण्यात आली आहे. परंतु हा दाखला आणण्यासाठी गेल्यानंतर तुमचा परिसर हा क्लस्टरमध्ये जात असल्याने तुम्हाला परवानगी देता येऊ शकत नसल्याचे उत्तर पालिकेच्या क्लस्टर सेलकडून दिले जात आहे. त्यामुळे शहरातील अनेक छोट्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.
दुसरीकडे १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. यातील अनेक झोपडपट्ट्यांचा एसआरएच्या माध्यमातून सर्व्हे झालेला आहे, काहींची कामेही सुरु झाली आहेत. काही ठिकाणी नागरीकांना भाडे देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तर तब्बल १६ प्रकल्पांच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून हे सर्व प्रकल्प युआरपीमध्ये येत असल्याने या प्रकल्पांच्या पुढच्या प्रक्रियेलाच ब्रेक लागला आहे.
या एसआरए योजनांच्या प्रक्रिया रखडल्या
पाचपाखाडी, बुद्ध फुलेनगर, चेंदणी कोपरी, माजिवडे, कोपरी (ठाणेकरवाडी), पाचपाखाडी (सर्व्हे नं ४४७ पैकी ४४८), मौजे ठाणे, भीमनगर (वर्तकनगर), मौजे पाचपाखाडी (प्लॉट नं ३९२), मौजे ठाणे (मार्क्स नगर, आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक), नौपाडा (बी केबिन), मौजे ओवळा, चरई, मौजे पाचपाखाडी ( भूमापन क्रमांक १६३/३/ ब ), मौजे चेंदणी ( नगर भूमापन क्रमांक ९६० ते ९७९ )
चालू एसआरए प्रकल्प बंद होऊ देणार नाही-आ. केळकर
अधिवेशनात चर्चा घडवून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर अधिकृत इमारतींना क्लस्टर योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आधीच एसआरए योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांना क्लस्टरमुक्त करण्याचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करून हजारो झोपडीधारकांना दिलासा देणार आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, एसआरए प्राधिकरण अधिकारी आणि ठाणे महापालिका आयुक्त यांच्याशीही सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.