ठाणे मंडळात सात कोटी ४२ लाख रुपयांची वीजचोरी
ठाणे : ‘महावितरण’च्या भांडूप परिमंडळात एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत १८ कोटी ४८ लाख रुपयांची तब्बल पाच हजार ६७० वीजचोरींची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापैकी ठाणे मंडळात तब्बल सात कोटी ४२ लाख रुपयांची चोरी झाली आहे.
‘महावितरण’ची थकबाकी वाढत असल्यामुळे वीज देयकांच्या वसुलीवर विशेष लक्ष देणे सर्व परिमंडळांना गरजेचे आहे, मात्र वीजेचा अनधिकृत वापर रोखणे आवश्यक असल्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना वीज बील वसूलीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
थकबाकी वसूलीसह मीटरची तपासणी, आकडा टाकून वीजचोरी करणे आदी मोहिमा करण्यात येत आहेत. ठाणे मंडळ कार्यालयातंर्गत ६५४ प्रकरणात तीन कोटी २४ लाख, वाशी मंडळ कार्यालयात एक हजार ७५ प्रकरणांमध्ये चार कोटी ५७ लाख व पेण मंडळ कार्यालयात ६८६ प्रकरणी दोन कोटी सहा लाखांची चोरी पकडण्यात आली.
विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ठाणे मंडळ कार्यालयात १७०१ प्रकरणात चार कोटी ५७ लाख, वाशी मंडळात ६४६ प्रकरणात दोन कोटी ३२ लाख आदी मंडळासह एकूण २६०८ प्रकरणात सात कोटी १८ लाख रुपयांचा अनधिकृत वीजेचा वापर आढळून आला. याशिवाय आकडा टाकून वीजचोरी केल्याची ५४७ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
या मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता व लाईनस्टाफनी मेहनत घेतली आहे. वीजचोरी करणा-या ग्राहकांना विद्युत कायद्यानुसार दंड आणि कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे वीजचोरीपासून दूर रहावे, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे.