ठाणे : ‘विद्यार्थी दशा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची असते. त्यावेळी योग्य दिशेने प्रयत्न केले तर उत्कर्षाचे उड्डाण यशस्वी होऊ शकते’, असे मत वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी व्यक्त केले.
श्रीरंग विद्यालयात भरवण्यात आलेल्या उर्जा प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मोसेस कोलेट विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय देशमुख अध्यक्षस्थानी होते. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात 50 शाळा आणि चारशेच्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध 13 स्पर्धा आणि प्रकल्पांतून पुरस्कार देण्यात आले. (सविस्तर निकाल चौकटीत पहा)
डॉ. राठोड यांनी मुलांना आवाहन करताना चिकित्सकवृत्ती जागी ठेवण्याचा सल्ला दिला. पालकांनी मुलांवर आपल्या साकार न झालेल्या महत्वाकांक्षा लादू नयेत असेही ते म्हणाले. प्राचार्य कोलेट यांनी श्रीरंग शिक्षण संस्थेचे उपक्रमाबद्दल कौतुक केले. मुलांनी निरीक्षणशक्तीला प्रश्न विचारण्याची जोड द्यावी असे सुचवले. आपल्या अवतीभोवती घडणारे बदल टिपून त्यावर संशोधन करण्याची क्षमता वाढवावी असेही ते म्हणाले. विज्ञान हे सर्वव्यापी झाले असून मानवाच्या जीवनमानावर त्याचा थेट परिणाम होत असतो, असेही ते म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिन्द बल्लाळ, सचिव प्रमोद सावंत, खजिनदार महेश भोसले, प्रा. नमिता निंबाळकर, अभिजीत मुरांजन, तुषार देसाई, हेमंतकुमार लोखंडे, सौ. अरुंधती लिमये, गणेश मोरे हे कार्यकरिणी मंडळ सदस्य उपस्थित होते.