भिवंडी : भिवंडी तालुक्यातील लोणाड गावात जमिनीच्या वादातून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली असून या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने एकमेकांवर परस्पर गुन्हे दाखल केले असून गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बळीराम केणे असे तक्रारदाराचे नाव असून ते भिवंडी तालुक्यातील भावाळे गावात कुटूंबासह राहतात. तर दुसऱ्या गटातील तक्रारदार सुदर्शन पाटील हे तालुक्यातील कशीवली गावात राहत असून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून जमिनीवरून वाद सुरु आहे. ज्या जमिनीवरून वाद आहे ती जमीन एका बांधकाम विकासकाला विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
१९ जानेवारी रोजी सुदर्शन पाटील हे त्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी वेहळे गावातील वेताळ पाटील आणि हर्षद पाटील यांच्यासह १० ते १२ साथीदारांच्या मदतीने पोकलेन लावून काम सुरु केले. याची माहिती बळीराम केणे आणि त्यांच्या कुटूंबाला मिळताच केणे कुटूंबाने घटनास्थळी धाव घेऊन जमिनीवर सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात जोरदार वाद होऊन सुदर्शन पाटीलसह त्यांच्या १० ते १२ साथीदारांनी लोखंडी रॉड, आणि लाकडी दांडक्याने केणे कुटूंबासह जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही गटातील ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी २० जानेवारी रोजी पडघा पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर परस्पर गुन्हे दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.