उड्डाणपुलावरून कोसळून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक येथील पहाटेची घटना

ठाणे : भरधाव वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांचा मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्रतिक मोरे (२१) रा. लोकमान्य नगर पाडा-१ आणि राजेश गुप्ता (२६) रा. उल्हासनगर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे २३ जानेवारीला पहाटे ३.३०च्या दरम्यान माजिवडे येथून भरधाव वेगाने कोर्ट नाका परिसर येथे जात असताना मीनाताई ठाकरे उड्डाणपूल कॅसल मिल नाका येथे आले. कोर्ट नाका बाजूकडे जाणारी मार्गिकाच बंद असल्याने त्यांनी ब्रेक आवळला. त्यावेळी त्यांची दुचाकी दुभाजकाला आदळून ते दोघेही खाली पडले. त्यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत राबोडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.