‘वागिर’ नौदलाला पूर्णपणे बळकटी देणार – आर. हरीकुमार

कलवरी पाणबुडी ताफ्यात

ठाणे :  भारतीय नौदलाच्या प्रकल्प 75 आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा नौदलाने सोमवारी आयएनएस ‘वागिर’ पाणबुडीचा समावेश ताफ्यात करुन साधला. त्यामुळे ‘आयएनएस वागीर पश्चिम नौदल मुख्यालयाचा महत्वाचा भाग असेल. या पाणबुडीमध्ये प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि लांब पल्ल्याची  मार्गदर्शित टॉर्पेडो तसेच शत्रुंच्या नौैकांविरोधी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.

पाणबुडीचे ब्रीदवाक्य, ‘साहस, शौर्य समर्पण’हे धैर्य, शौर्य आणि समर्पण या मूलभूत मूल्यांचे प्रतीक आहे. दिल्लीतील नौदल मुख्यालयाचे भूतपूर्व उपप्रमुख आणि निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार यांनी ‘वागिर’ची वैशिष्ट्ये विषद करताना ‘साहस, शौर्य समर्पण’ही प्रतिके समर्पक असल्याचे सांगितले.

नौदलाची पाचवी स्टेल्थ स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी ‘वागिर’ 23 जानेवारी 23 रोजी मुंबई नौदल गोदीत समारंभाचे प्रमुख पाहुणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरीकुमार यांच्या उपस्थितीत दाखल झाली. ‘माझगाव गोदी’च्या सहकार्याने  भारतात सहा स्कॉर्पिन क्लास पाणबुड्या तयार केल्या जात आहेत. ‘वागिर’ ही पश्चिम मुख्यालयाच्या शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली  भाग असणार आहे. ‘वागिर’च्या सागरी चाचण्या 12 नोव्हेंबर 20 रोजी पूर्ण झाल्यानंतर 20 डिसेंबर 22 रोजी नौदलाची ताकद आणि शक्ती वाढली आहे. आजपर्यंतच्या सर्व स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांपैकी सर्वात कमी बांधण्याचा वेळ वागिरचा आहे.

पश्चिम मुख्यालयाचे ध्वजाधिकारी व्हाईल अ‍ॅडमिरल एबी सिंग आणि माझगाव गोदीचे व्यवस्थापकीय संचालक व्हाईस अ‍ॅडमिरल नारायण प्रसाद (निवृत्त) आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते. २००१ मध्ये रद्द करण्यात आलेल्या रशियन वंशाच्या फॉक्सट्रॉट क्लास पाणबुडीच्या पूर्वीच्या ‘वागिर’च्या समारं भा साठी विशेष निमंत्रित होते आणि तत्कालिन कमिशनिंग कमांडिंग आॅफिसर रिअर  अ‍ॅडमिरल के. राजा मेनन (निवृत्त) देखील उपस्थित होते.

नौदल प्रमुखांनी यावेळी सांगितले की, ‘वागिर’  भारतीय नौदलाच्या आॅपरेशनल सामर्थ्याला आणखी महत्त्वपूर्ण बळ देईल आणि कोणत्याही शत्रूसाठी एक शक्तिशाली प्रतिबंधक म्हणून काम करणार आहे. २४ महिन्यांच्या अल्प कालावधीत नौदलात सामील झालेली ‘वागिर’ तिसरी पाणबुडी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ही संपूर्ण तयारी 2047 पर्यंत पूर्णपणे ‘आत्मनिर्भर दल बनण्याच्या भारतीय नौदलाच्या नि:संदिग्ध वचनबद्धतेला आणि दृढ निश्चयाला बळकटी देणारी आहे.