डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरबंदी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये १५ नोव्हेंबर २०२२ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

श्री. पठारे यांनी काढलेल्या मनाई आदेशात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये संध्याकाळी ६ वाजता ते सकाळी ६ वाजता या कालावधीत टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल वाहून नेवून नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०२२ ते १३ जानेवरी २०२३ या काळात डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.