दोनशे विद्यार्थ्यांमागे फक्त दोन शिक्षक

ठामपा शाळांमध्ये शिक्षकांची २३४ पदे रिक्त

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल २३४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही पदे भरण्यात आली नसल्याची कबुली ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षक भरतीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही भरती होऊ शकलेली नाही. परिणामी तासिकांवर शिक्षक घेण्याची नामुष्की पालिकेच्या शिक्षण विभागावर ओढवली आहे. यासाठी ७५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेत २३४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २०० विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील जिल्हापरिषदांच्या शाळांची अवस्थाही अशीच बिकट आहे. एका बाजूला मुंबई महापालिका, ठाणे जिल्हापरिषद अशा शासकीय स्वराज्य संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे सकारात्मक चित्र असताना शिक्षकच शाळांमध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांनी करायचे काय असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या १३१ शाळा असून यामध्ये हजारोंच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये २२ माध्यमिकच्या शाळा असून ७१ मराठी माध्यमांच्या, ८ हिंदी, ७ इंग्रजी तर २३ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. पालिकेच्या सर्व शाळांचा विचार केल्यास तब्बल २३४ शिक्षकांची पदे रिक्त असून एकट्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये १४७ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाकडून पवित्र पोर्टलचे कारण दिले जाते. त्यामुळे रिक्त पदाचा हा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम कशा पद्धतीने होणार याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने पर्याय म्हणून ७५ तासिका शिक्षकांची पालिकेच्या शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांना एका तासांमागे १०० रुपयांचे मानधन दिले जाते. वर्षाला याच मानधनाच्या पोटी ठाणे महापालिकेला एक कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागत असल्याने कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमधून वर्षाला ७५ पेक्षा अधिक शिक्षक हे निवृत्त होत आहे. त्यामुळे रिक्त पदाचा आकडा वर्षाला वाढतच चालला आहे. त्यात दोन वर्ष नवीन भरती झाली नसल्याने रिक्त पदांचे आणि भरतीचे गणित पूर्ण बिघडले आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानावर याचा परिणाम होत असून ही सांगड कशी घालायची असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.

चौकट
* महापालिकेच्या एकूण शाळांची संख्या – १३१
* सध्या कार्यरत असलेल्या एकूण शिक्षकांची संख्या – ७३०
* मराठी माध्यमाच्या शाळा – ७१
* इंग्रजी माध्यमाच्या शाळा -७
* उर्दू माध्यमाच्या शाळा – २३
* हिंदी माध्यमाच्या शाळा – ८
* माध्यमिक शाळांची संख्या – २३