आमदार प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण
ठाणे : किरीट सोमय्या यांच्याबरोबर व्यासपीठावर जायचे कि नाही हा नंतरचा प्रश्न आहे, मात्र सोमय्या यांच्या विरोधात माझी न्यायालयीन लढाई असून ती मी लढणारच असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
विहंग गार्डन या इमारतीच्या मुद्यावरुन ठाण्यात सोमय्या विरुध्द सरनाईक यांच्यातील संघर्ष थेट न्यायालयापर्यंत गेलेला आहे. मध्यतंरी सरनाईक यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा देखील लागला होता. परंतु या घटना घडत असतांनाच सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचे विचार मांडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान शिंदे यांच्या बंडानंतर ते देखील शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता ते प्रथमच गुरुवारी ठाणे महापालिकेत आले असतांना पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सोमय्या यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वाढत होती. त्यामुळे सर्व आमदारांच्या मनात खदखद होती. ती खदखद मी पत्राद्वारे उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. मुख्यमंत्री आपला असतांनाही कामे राष्ट्रवादीची अधिक होत असल्याचे सर्व आमदारांचे म्हणणे होते. त्या पत्राची दखल घेतली नव्हती. परंतु माझ्या पत्राची दखल शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १० अपक्ष आमदारांनी घेतली. त्यामुळे आज अभिमानची गोष्ट आहे की,ठाणे शहरातील आमदार एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आहे आणि ठाण्यातील रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले असल्याचेही सरनाईक म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात देखील आरटीई अंतर्गत विहंग गार्डनची माहिती मागविण्यासाठी अर्ज केला होता. मलासुध्दा भेटले होते. माझ्यासोबत सेल्फी काढली होती. सोमय्या यांच्याविरोधातील लढाई ही न्यायालयीन आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केले, केस टाकली मी सुध्दा त्यांच्याविरोधात दोन केस टाकल्या. परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरुच राहिल. मात्र त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचे की नाही, हा नंतरचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांच्या मतदार संघासाठी ३५० कोटींचा निधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा या मतदार संघासाठी तब्बल ३५० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीचा विनियोग कोणत्या प्रकल्पासाठी करायचा याचे नियोजन करण्यासाठी ते ठाणे महापालिकेत आले होते. यावेळी या सरकारच्या माध्यमातून नियोजित विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या चौकशीसाठी जे सीआरपीएफचे जवान माझ्या घरी आले होते, तेच जवान आज माझ्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे काळ कोणासाठी कधी थांबेल आणि कालचक्र कसे फिरेल हे सांगता येत नाही. परंतु जुन्या गोष्टींचे कित्ते गिरविण्यापेक्षा ठाण्याच्या विकासाचे आणि सुगीचे दिवस आलेले आहेत, हे महत्वाचे आहे. आता झाले गेले विसरुन जावे असे त्यांनी शेवटी सांगितले.