टिटवाळा रेल्वे उड्डाणपूलाच्या कामात रिंगरोडचा भाग बाधित

नियोजनाअभावी दीड कोटींचा फटका

कल्याण : बाह्यवळण रस्त्यासाठी (रिंगरोड) केलेल्या खोदकामात खर्च झालेले दीड कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत. टिटवाळा (मांडा) येथे रेल्वे उड्डाणपूल उतरविण्यासाठी बनवलेल्या या रस्त्याच्या चार पैकी दोन लेन (मार्गिका) सुमारे ५० मीटर पेक्षा अधिक लांब खोदाव्या लागल्याने पालिका अधिकाऱ्यांमधील नियोजनाचा अभाव उघडकीस आला आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक (गेट) कायमस्वरूपी बंद करून तेथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे धोरण स्वीकारले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही रेल्वे फाटक असलेल्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. यापूर्वी वडवली येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. असाच रेल्वे उड्डाणपूल टिटवाळा (मांडा) येथे बांधण्याचे काम रेल्वे प्रशासन व महापालिकेच्या सहकार्याने सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हा उड्डाणपूल पश्चिमेला उतरविण्यासाठी आधीच बांधून झालेल्या बाह्यवळण रस्त्याच्या दोन लेन (मार्गिका) सुमारे ५० मीटरपेक्षा अधिक लांब पूर्ण खोदण्यात आल्या. परिणामी त्यासाठी झालेला खर्च पाण्यात गेला आहे. काही कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार खोदलेल्या रस्त्यासाठी सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च झाला असावा. यावरून हा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाह्यवळण रस्ता आणि मांडा येथील रेल्वे उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पात केडीएमसी सहभागी असल्याने केडीएमसीने समन्वय राखला असता तर उड्डाणपूल बाह्यवळण रस्त्यावर उतरविण्यासाठी निर्धारित जागेवरील रस्त्याचे काम टाळून उर्वरित रस्त्याचे काम करता आले असते. त्यायोगे बांधलेला रस्ता खोदण्याची वेळ आली नसती व शासनाचे कोटी रुपये देखील पाण्यात गेले नसते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वाया गेलेले दीड कोटी रुपये सबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावेत अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.  शहर अभियंता, सदर रिंगरोड प्रकल्पाचे व बांधकाम विभागाचे प्रमुख यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी असताना असा प्रकार घडलाच कसा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या संदर्भात आपली बाजू मांडताना एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता पी. जे. भांगरे यांनी सांगितले की, एमएमआरडीए व केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दोघांतील सामंजस्य करारानुसार या रस्त्यासाठी केडीएमसीने जमीन उपलब्ध करून दिली असून रस्त्याचे बांधकाम एमएमआरडीएमार्फत स्वनिधीने करून देण्यात आले आहे. सदर रस्ता पूर्ण करून दि. २५/०२/२०२२ रोजी केडीएमसीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. केडीएमसीने मांडा (टिटवाळा) येथील बाह्यवळण रस्त्याच्या पूर्ण झालेल्या रस्त्यांपैकी सुमारे काही लांबी रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदल्या असाव्या असे समजते. तथापि रस्त्याची देखभाल दुरुस्ती भविष्यातील विकास करण्याची जबाबदारी केडीएमसीची आहे.

दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्ता पूर्ण करून दि. २५/०२/२०२२ रोजी केडीएमसीकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले असले तरी मांडा येथील टेकडी जवळ या रस्त्याचे काही मीटर बांधकामच झालेले नसल्याचे दिसत आहे.

शेकडो कोटींचा प्रकल्प रखडला

कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक परस्पर शहराबाहेर वळवली जाऊन शहरांतर्गत वाहतुकीवरील ताण कमी व्हावा या दृष्टीने बाह्यवळण रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीए व केडीएमसीतर्फे संयुक्तरीत्या हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यात अनेक ठिकाणी अडचणी असल्याने शेकडो कोटी रुपयांचा हा प्रकल्प रखडल्यात जमा आहे. हा बाह्यवळण रस्ता एमएमआरडीए स्वखर्चाने बांधून देणार आहे तर केडीएमसी त्यासाठी जमीन उपलब्ध करुन देणार आहे. महापालिका स्वत: बाह्यवळण रस्ता बांधणार नसली तरी रस्त्याशी सबंधित सर्व बाबींवर लक्ष देणे ही महापालिकेची जबाबदारी असणार हे स्पष्टच आहे.  या प्रकल्पासाठी सुमारे रु. २७८.९३ कोटी खर्च अपेक्षित असून दि. १४/०८/२०१७ रोजी कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. या कामासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागणार असून दि. ३१/०३/२०२२ पर्यंत सदर काम पूर्ण होण्याचे अपेक्षित धरण्यात आले होते. हा रस्ता १६.४० किमी लांब असून डांबरी मार्गिका २+२ लेन आणि उर्वरित भागात कच्ची मार्गिका, रस्त्याच्या दोन्ही बाजूस पर्जन्यवाहिन्या, विकसित परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.