* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
* सर्व कुटुंबियांसोबत विठ्ठलाचे दर्शन घेणार
ठाणे : जशी इतर देवस्थान आहेत तसे पंढरपूर हे एक मोठे देवस्थान आहे. या ठिकाणी चंद्रभागा नदी आहे. त्यामुळे तात्पुरता विकास न करता संपूर्ण पंढरपूरचा कायापालट झाला पाहिजे यासाठी वेगळा विकास आराखडा तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निधी देखील कमी पडू देणार नसल्याचे सांगत ज्या पांडुरंगामुळे मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळाला त्यांच्या दर्शनासाठी सर्व कुटुंबियांसोबत जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी निमित्त त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांची बुधवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. दोन वर्ष वारी न झाल्याने यावर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. यावर्षी पंढरपूरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय शौचालयांच्या स्वच्छतेसाठी २४ तास कर्मचारी,कपडे बदलण्यासाठी निवारा, रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विशेष म्हणजे आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करण्याचे निर्दश देण्याबरोबरच वारीचा मार्ग खड्डेमुक्त ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
या सर्व सुविधा देण्यासोबतच पंढपूरच्या सर्वागीण विकासाठी वेगळा विकास आराखडा तयार करण्यासोबतच यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
वारीसाठी ४७०० एसटी बस
वारीसाठी स्वतःचे वाहन घेऊन जाणाऱ्यांसाठी टोलमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी, एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्याच्या सेवेसाठीही एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० गाड्या सोडल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे वारीसाठी एसटीचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवासही यामुळे सुकर होणार आहे.
वारीला जाणाऱ्या गाडयांना टोलमाफी
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांची नोंद करून त्या वाहनांना टोलमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले . टोलमाफीसाठी वारकरी बांधवांच्या त्या वाहनांना स्टिकर्स वाटप करा असे निर्देश दिले. याशिवाय अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, अशी सूचनाही केली.