दिवा स्थानकात प्रसूती; बाळ-बाळंतीण सुखरूप

रेल्वे सुरक्षा बलाची ‘ममता’

ठाणे : टिटवाळ्याहून रुटीन चेकअपसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात पतीसमवेत जात असताना, दिवा स्थानकात चक्कर येऊन एका ३० वर्षाच्या गरोदर महिलेची फलाटावर प्रसूती झाली. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती महिला पोलीस ममता डांगी यांनी दिली.

बुधवारी सकाळी ८.२० वाजता दिवा स्थानकातील उपस्थानक अधिक्षक सत्यनारायण वर्मा यांना एका महिला प्रवाशाला फलाट क्र. १ वर चक्कर येत आहे असा संदेश मिळला. त्यांनी वेळ न दवडता ही माहिती दिवा आरपीएफचे प्रमुख निरीक्षक गिरीश तिवारी आणि सहाय्यक उपनिरीक्षक आनंद गायकवाड यांना कळवली. या घटनेचे गांभिर्य लक्षात आल्यानंतर त्यांनीही त्वरेने रेल्वे सुरक्षा बलाची स्थानिक यंत्रणा आणि कॉन्स्टेबल ममता डांगी, उपनिरीक्षक सुभाष शर्मा आणि रेल्वे पोलिस कर्मचारी सी.के. गायकवाड यांना गरोदर महिला नामे नाजमीन जहान (३०) यांची संपूर्ण मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी महिलेचा पती फसीमुद्दीन (३२) यावेळी उपस्थित होता. हे दांपत्य त्यावेळी कमालीचे घाबरलेले होते. कारण नाजमीनला लोकलमध्येच प्रसूतीकळा सुरु झाल्या होत्या. दिवा स्थानक येताच प्रसुतीकळा वाढतच गेल्याने दोघांचीही घालमेल सुरु होती.

ते कसेबसे स्थानकात, फलाटावर उतरताच नाजमीनची प्रसूती झाली. त्यावेळी सभोवताली असलेल्या अनेक महिलांनी तिला धीर दिला तर काहीजणींनी तिच्याभोवती गराडा घालून हाती मिळेल त्या वस्त्राने आसरा दिला. ‘रेसुब’च्या ममता डांगी आणि रेल्वे पोलीस सी.के. गायकवाड यांनी त्यांना दिवा येथील बालाजी हॉस्पिटल येथे नेले. डॉ. सरमन यांनी महिला आणि बालिकेची तपासणी केली असता त्या दोघींची प्रकृती निरोगी असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी आपल्या देखरेखीखाली ठेवले आहे.