ठाणे : ठाणेकरांनाच नव्हे तर मुंबईसह ठिकठिकाणचे वन्य, पक्षीप्रेमी यांना ठाणे खाडीत दरवर्षी येणा-या शेकडो फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी आकर्षण असल्यामुळे तेथील अभयारण्याला रामसर दर्जा केव्हा मिळणार याची आतूरता लागली आहे.
हे स्थान ठाणे खाडी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेला असून, ठाणे आणि नवी मुंबईच्या सीमारेषा परस्परांना सामायिक करतात.
गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीसाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर जैवविविधतेने समृद्ध असलेल्या फ्लेमिंगो अभयारण्याला रामसर दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात मंजुरी दिली. ‘लोणार’ला ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला असून, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यालाही रामसर दर्जा द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
इराण देशामधील ‘रामसर’ शहराच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. तेथे सन १९७१ मध्ये या अधिवेशनावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ‘रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स विशेषत: ‘वॉटरफॉल हॅबिटॅट’ हा पाणथळ जमिनीच्या संरक्षण आणि शाश्वत वापरासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आहे. याला ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ’ असेही संबोधले जाते.
‘रामसर’ स्थळाचे अनेक फायदे होणार आहेत. पाणथळ जागेचे संवर्धन आणि योग्य वापर करण्यास मदत होणे, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणे, भरघोस केंद्रीय निधी मिळाल्यास स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळणे, स्थानिक रहिवाशांसाठी रोजगार निर्माण होणे आणि या स्थळाच्या आजूबाजूला असलेल्या उद्योग व व्यवसायांना आर्थिक लाभ मिळणे, येथे वाढलेल्या पर्यटटनानंतरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करणे आदी फायदे होतील, अशी अशी माहिती ठाणे येथील एका वन अधिका-याने दिली.