ठाण्यात शुकशुकाट; शिवसैनिक संभ्रमात

ठाणे : शिवसेनेमध्ये जेव्हा जेव्हा बंड झाली तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचं पहायला मिळालं. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसैनिक शांत दिसत असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

ठाण्यातील टेंभी नाका, आनंद मठ, एकनाथ शिंदेंचं निवासस्थान, शाखा आणि महानगरपालिका या परिसरामध्ये शांतता होती. ठाणे महापालिकेबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जिल्ह्यात श्री. शिंदे यांना मोठा जनाधार असून आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जायचं कि आपल्या नेत्यांसोबत राहायचं अशा दुहेरी कात्रीत ठाण्यातील शिवसैनिक सापडले आहेत.

राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे मंत्री म्हणून श्री. शिंदे यांना महत्व आहे. तरी देखील त्यांना पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना दूर ठेवले जात होते, त्यामुळेच श्री. शिंदे हे मागील बऱ्याच काळापासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाबरोबरच ठाणे आणि गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. शिवसेनेने आपली विजयी पताका सर्वात आधी ठाण्यात रोवली होती. तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाले तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एकनाथ शिंदेंचं नावही होतं. त्यावेळी ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. काही ठिकाणी तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स देखील ठाण्यात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मात्र शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील अशी भूमिका घेतल्याने एकनाथ शिंदेंचं नाव मागे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन नंबरचे मंत्री पद असले तरी त्यांना कायम शिवसेनेमधील दुय्यम स्तरातील जबाबदारी सोपवण्यात आली.

मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे कारभार इतर नेत्यांकडे सोपवण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या तेव्हा सुद्धा शिंदेंचेचं नाव चर्चेत आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची ही अफवा असल्याचे स्पष्ट करत या संपूर्ण चर्चांवर पडदा टाकला होता. श्री. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील रस्त्यावर शुकशुकाट होता. ठाणेकर टीव्हीवर बातम्या पाहून श्री. शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष ठेऊन होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समाजमाध्यमातून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत होता. अनेकांनी तर श्री. शिंदे यांचे स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने अन्याय केला अशी भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली होती. अनेक शिवसैनिकांनी तशी भावना ‘ठाणेवैभव’जवळ व्यक्त केली.

स्वर्गीय आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पहिले जाऊ लागले होते. एकनाथ शिंदे यांनीही ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता टिकवून त्यांचे नेतृत्व सिद्ध केले. केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द हा शिवसैनिकांकडून प्रमाण मानला जात असल्याने आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आपण काय भूमिका घायची? असा संभ्रम ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.

ठामपाची निवडणुक स्वतंत्र लढण्याची इच्छा

एकनाथ शिंदे यांना ठाणे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवायची होती. ठाण्यातील शिवसैनिकांचेही एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेला पूर्ण समर्थन होते. त्यामुळे ठाण्यात सुरुवातीपासून माजी महापौर नरेश म्हस्के हे स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा करत होते. मात्र संजय राऊत यांच्यासह काही नेते त्यांच्यावर राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी दबाव आणत होते. ही नाराजी देखील एकनाथ शिंदे यांची होती. ठाण्यातील शिवसैनिकांना देखील आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. आघाडीमध्ये जर निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मते शिवसेनेला मिळणार नाहीत तर यात दुसरीकडे शिवसेनेचे नुकसानही होणार होते.