ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर ठाण्यातील ८० टक्के नगरसेवक त्यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील अन्य महापालिकांमध्ये दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आगामी होऊ घातलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. ठाणे महापालिकेबरोबरच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा जनाधार आहे. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तीच ठाणे महापालिकेतील नगरसेवकांची दिशा असते. त्यामुळे आता शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील ज्या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे ती सत्ता शिवसेनेला गमवावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी जर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर यामुळे ठाण्यात सत्त्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला फायदा होणार असून यामुळे ठाण्यातील भाजपचा सत्त्तेचा मार्ग देखील सुकर होणार आहे. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे २४ नगरसेवक निवडून गेले होते तर शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून गेले होते. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी ठाण्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद सुरूच होते. त्यामुळे भाजप सोबत युतीची भूमिका मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात भाजपचा मार्ग अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत.
नरेश म्हस्के मातोश्रीवर गेलेच नाहीत
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मातोश्रीवर शिवसेना आमदारांची आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीला ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र नरेश म्हस्के हे मातोश्रीवर गेलेच नसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नरेश म्हस्के देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याची दाट शक्यता आहे. ठाण्याच्या राजकारणात नरेश म्हस्के हे देखील महत्वाची भूमिका बजावत असल्याने ठाण्याच्या राजकारणावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.