भाज्यांचे टेम्पो आणि शाळांसमोरील वाहनांच्या गर्दीने वाहतूक कोंडी
ठाणे : येथील पश्चिमेला असलेल्या कॅसल मिल, सिव्हील हॉस्पिटलपासून ते ठाणे स्थानकापर्यंत विशेषतः जांभळी नाका ते स्टेशन रोडपर्यंतच्या वाहतूक कोंडीने चाकरमानी हैराण झाले आहेत. या कोंडीत बस आणि रिक्षा अडकून पडत असल्याने चाकरमान्यांना नाहक लेटमार्कला सामोरे जावे लागत आहे.
शहरात भर पावसात सुरू असलेली खोदकामे, घोडबंदर मार्गावरील मेट्रोची कामे यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असताना जांभळी नाका येथील भाज्यांच्या गाड्यांमुळे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी कामाला जाण्याच्या वेळी अद्भुत कोंडी होते. यात रिक्षा आणि परिवहनच्या गाड्या अडकून पडतात आणि चाकरमान्यांना रेल्वेने कामाच्या ठिकाणी जायला उशीर होतो. जांभळी नाक्यावर भाज्यांच्या गाड्या अस्ताव्यस्त आणि उशिरापर्यंत उभ्या राहत असतात. हा रस्ता मोकळा ठेवण्यासाठी वाहतूक विभागाची अपेक्षित कार्यवाही सततच्या तक्रारीनंतरही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील काही मोठ्या शाळांच्या आडमुठ्या धोरणामुळेही रस्ता कोंडी उद्भवून नागरिकांना मनःस्ताप सोसावा लागतो. राबोडीच्या सीमेवरील हॉलीक्रॉस आणि चरई भागातील सेंट जॉन स्कुलसमोरील रस्तेही वाहतूक कोंडीने गुदमरून गेलेले असतात. या शाळांमध्ये मोकळी जागा मोठ्या प्रमाणात असतानाही पालकांच्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ही वाहने शाळांसमोरील रस्त्यावर नाईलाजाने ठाण मांडून असतात. त्यामुळे इतर वाहने आणि नागरिकांचाही कोंडमारा होतो. मुलांना शाळेत सोडण्यासाठी किमान एक मिनिट पालकांची वाहने शाळांच्या आवारात आणण्याची परवानगी दिली तर हे मुख्य रस्ते वाहतूक कोंडीच्या जाचातून नक्की सुटतील, असे मत ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
आज सोमवारी कोपरी येथील सर्व्हिस रस्त्यावर शाळेसमोर शाळेची बस बराचवेळ बंद पडली होती. चालक मदतीसाठी जरासाही न हलता बसमध्ये बसून राहिला होता. परिणामी काही मिनिटांतच मुंबईला व ठाण्यात जाणा-या लहान-मोठ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या रांगेतही एक मोठी बस हळू हळू पुढे सरकत असल्याने वाहने सुमारे अर्धा किलोमीटर खोळंबली. त्याचवेळी दोन रुग्णवाहिकांना थांबावे लागले. ही वाहनकोंडी सोडवण्यासाठी फक्त एकच वाहतूक पोलिस उपनिरीक्षक जगदाळे उपस्थित होते. अखेरीस त्यांनी ही कोंडी फोडली.
अशा प्रसंगी अनेक वाहन चालकांनाच त्यांचा ‘वाटाड्या’ व्हावे लागते. असे अनुभव सोमवारी कॅसल मिल ते तलावपाळी, हरी निवास ते तीन पेट्रोल पंप, वंदना सिनेमा, कळवा पूल ते जिल्हाधिकारी कार्यालय, तीन हात नाका- नौपाडा ते हरी निवास आदी रस्त्यांवर दररोज येत आहेत. त्यातच ठाणे वाहतूक पोलिसांकडे तोकडे मनुष्यबळ असल्याने बेशिस्त वाहन चालक हवे तसे वाहन पळवत असतात. त्यातून छोटी-मोठी घटना घडली की रस्त्यात पुन्हा कोंडी होतेच.
वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिका-यांना याविषयी विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘शहरातील काही भागांमध्ये पावसाळापूर्व कामे अजूनही सुरु आहेत. पावसाचा जोर वाढेपर्यंत ही कामे होतच राहतील, कारण ही कामे अर्धीच राहिल्यास वाहन कोंडी वाढून चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.