फुटबॉल महाराष्ट्र उत्कृष्टता केंद्रामुळे भारताला कुशल खेळाडू गवसतील!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास

नवी मुंबई : खारघर येथे उभारण्यात येणाऱ्या फुटबॉल महाराष्ट्र उत्कृष्टता केंद्रामुळे (सेंटर ऑफ एक्सलन्स) असंख्य कौशल्यवान क्रीडापटू घडतील आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारा भारतीय संघ उदयास येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील या फुटबॉल केंद्राचे रविवारी ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे आभासी उद्घाटन करण्यात आले. या वेळी पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) प्रफुल्ल पटेल यांच्यासह असंख्य मान्यवर मंडळीनी उपस्थिती दर्शवली. २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत या केंद्रातील दोन मैदानांचा वापर होणार आहे. त्याशिवाय ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील काही सामनेही येथे खेळवण्यात येणार आहेत.

‘‘भारतीय फुटबॉलच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याच्या हेतूने बनवण्यात आलेल्या या मैदानांमुळे असंख्य युवा क्रीडापटूंचे स्वप्न पूर्ण होईल. आगामी आशिया चषकाच्या उत्तम आयोजनासाठी आयोजकांना माझ्या शुभेच्छा. या स्पर्धेसह भविष्यातही भारतीय फुटबॉलपटू नक्कीच उज्ज्वल कामगिरी करतील, याची मला खात्री आहे,’’ असे ठाकरे म्हणाले.

मातीशी नाळ जोडली

तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानांशी तसेच मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. ‘‘आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. या केंद्रामुळे खेळाडू पुन्हा मैदानाकडे वळतील. खेळाडूंना येथे कोणत्याही सोयीसुविधांची उणीव भासणार नाही,’’ असे ठाकरे यांनी नमूद केले.

नव्या पिढीसाठी पर्वणी – आदित्य ठाकरे

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरेल, असे मत व्यक्त केले. ‘‘येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवी मुंबई परिसर क्रीडा क्षेत्रासाठीचे केंद्र्रंबदू होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे युवा पिढीने या संधीचा लाभ उचलणे गरजेचे आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ महाराष्ट्राला तसेच देशाला नावलौकिक मिळवून देतील,’’ असे आदित्य म्हणाले.