या चिमण्यांनो, परत फिरा…. या गाण्याची आठवण होईल, असा हा दिवस. अर्थात संदर्भ वेगळा असला तरी व्याकुळतेची भावना समान आहे.
गेली दोन वर्षे शाळेपासून दूर राहिलेल्या बच्चेकंपनीसाठी हा काळ किती कठीण आणि आव्हानात्मक ठरला असेल हे ते आणि त्यांचे पालकच जाणोत. या भाबड्या जीवांना मनातील भावना व्यक्त करता येणार नाहीत, परंतु त्यांच्या निरागस डोळ्यांत शाळेचा विरह जाणवण्याइतकी मोठी मंडळी नक्कीच प्रगल्भ आहेत. त्यांची ही घुसमट अखेर 15 डिसेंबर रोजी संपली. शाळा पुन्हा भरू लागतील आणि हवीहवीशी वाटणारी किलबिल कानी पडेल.
शाळांचे दरवाजे बंद होण्यास दीड वर्षांचा कालावधी गेला. महामारीची व्याप्ती, तो कोणाचा जीव घेईल आणि लागण झाली तर वैद्यकीय सेवेची उपलब्धता आणि खर्च या दोन्ही बाबींमुळे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची बहुसंख्य पालकांनी जोखिम घेतली नाही. आता हळूहळू या महासाथीची तीव्रता कमी होऊ लागल्यामुळे आणि उपचार पध्दती अवगत झाल्यामुळे भीती ओसरू लागल्यामुळे शासनाने आधी मोठे वर्ग आणि कालपासून पहिले ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालकांमध्ये अजूनही धाकधुक आहे. ती स्वाभाविक असली तरी कधी तरी मुलांची ही घुसमट थांबवण्याची तितकीच गरज आहे हे ओळखणार्या पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मनातून ही भीती हळूहळू बाहेर काढून अन्य पालकही मुलांचा खंडीत शैक्षणिक प्रवास सुरू करतील. शाळा सुरू आहेत हे दाखवण्यासाठी ऑनलाईन प्रयोग झाला. परंतु खरोखरच हा मार्ग प्रभावी होता काय, या प्रश्नाचे उत्तर संमिश्र मिळत आहे. शाळेचा वर्ग तेथील बाक, फळा, हाडामासाचा शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि एकुणच शाळांमध्ये ओतप्रोत भरलेला जीवंतपणा ऑनलाईन कसा अनुभवावा? आमच्या एका परिचिताच्या मुलाची बर्याच दिवसांनी शाळेतील मित्राची भेट झाली तेव्हा त्याने त्याला हात लावून हा आभास तर नाही ना याची खात्री करून घेतली. हा प्रसंग संवेदनशील मनाला हादरवणारा आहे. भयावह स्थितीत मुलांचे मानसिक आरोग्य बिघडले नाही तरच नवल. तशा तक्रारी घेऊन पालक मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊ लागले होते. ऑनलाईन शिक्षणाशी एकरुप झालेल्या शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण त्यालाही शेवटी मर्यादा असतातच की! त्यांना शिकवल्याचा आनंद जरूर मिळाला असेल, पण मुलांपर्यंत ज्ञान पोहोचले असेलच असे नाही. तात्पर्य, शाळा सुरू होणे याला गत्यंतर नव्हते. आता मोठ्यांचे लसीकरण झाल्यामुळे धोका निम्म्यावर आला आहे. मुलांसाठी लस तयार होण्याचे काम सुरू आहे. एकदा का मुलांनाही ते संरक्षण मिळाले तर शाळा पूर्ववत फुलू लागतील. पालकांनी मनात संदेह न ठेवता आपापल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घ्यावा आणि शाळांनीही सर्व पथ्य काटेकोरपणे पाळून पालकांना खात्री द्यावी. यासाठी सर्व घटकांना शुभेच्छा आणि बच्चेकंपनीला शुभाशीर्वाद!