क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल आदी खेळांकडून प्रेरणा घेत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) स्वत:ची लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी जूनमध्ये इंडियन चेस लीगचे आयोजन करणार असल्याची ‘एआयसीएफ’ने मंगळवारी घोषणा केली.
सहा संघांत होणाऱ्या इंडियन चेस लीगमध्ये प्रत्येक संघात दोन सुपर ग्रँडमास्टर, दोन भारतीय ग्रँडमास्टर, दोन महिला ग्रँडमास्टर, एक कनिष्ठ गटातील भारतीय मुलगा आणि एक कनिष्ठ गटातील भारतीय मुलगी यांचा समावेश असेल, अशी माहिती ‘एआयसीएफ’कडून देण्यात आली.
पहिल्यांदाच होणाऱ्या या लीगचे सामने दुहेरी साखळी (डबल राऊंड-रॉबिन) पद्धतीने खेळले जाणार आहेत. साखळी फेरीअंती गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम लढतीत आमनेसामने येतील. दोन आठवड्यांच्या कालावधीत एक किंवा दोन शहरांमध्ये या लीगचे सामने होणार आहेत. तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपणही केले जाईल.
‘‘आमचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. इंडियन चेस लीगमुळे देशात बुद्धिबळाचा चेहराच बदलेल. भविष्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी ही लीग फायदेशीर ठरेल,’’ असे ‘एआयसीएफ’चे अध्यक्ष डॉ. संजय कपूर म्हणाले.