वृक्षप्राधिकरण विभागाचा अहवाल
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार जुन्या ठाण्यातील उथळसर, नौपाडा आणि कोपरी परिसरातील तब्बल ३०५८ झाडे काँक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकले असून संपूर्ण ठाणे शहरात हा आकडा ९०५८ इतका आहे.
शहरातील रस्त्यांमध्ये काँक्रीटच्या विळख्यात अडकलेल्या या झाडांच्या मुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी सुमारे ३६ लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नऊ प्रभाग समितीमधील मुख्य आणि उपमुख्य रस्त्यांमध्ये असलेल्या झाडांच्या खोडांभोवती असलेले काँक्रीट काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील बहुतांश वृक्ष हे काँक्रीटमुक्त असल्याचा दावा न्यायालयात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दाव्याची याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी अक्षरशः पोलखोल केली होती . काँक्रीटच्या जाळ्यात वेढलेल्या काही वृक्षांची छायाचित्रेच जोशी यांनी न्यायालयात सादर करून पालिकेचा दावा किती खोटा आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते . यावर शहरातील किती वृक्ष काँक्रीटच्या विळख्यात आहेत यासंदर्भातही अहवाल सादर करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला न्यायालयाने दिले होते.
महापालिका कार्यक्षेत्रात जवळजवळ 400 कि.मी रस्त्याचे जाळे पसरलेले आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा शास्त्रोक्त पध्दतीने वृक्ष लागवड केलेली असून त्यापैकी ज्या वृक्षांच्या सभोवती सिमेंट काँक्रिट आहे ते निष्कासित करावे संदर्भात उच्च न्यायालयाने अंदाजे 7396 झाडांचे डि-काँक्रिटायझेशन करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय झाडांचे सर्व्हेक्षण करुन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा व सद्यस्थितीत असलेले सिमेंटीकरण तत्काळ हटवून या ठिकाणी झाडासभोवती तीन बाय तीन फूटाची जागा मोकळी ठेवून त्यात माती राहील या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने ठाणे शहरातील झाडांचे सर्व्हेक्षण केले असून त्यानुसार सिमेंट काँक्रीट आणि अस्फाल्टच्या विळख्यात तब्बल ९०५८ झाडे असून यापैकी उथळसर आणि कोपरी -पाचपाखाडी या दोन प्रभाग समितीमध्ये तब्बल ३०४९ झाडे ही काँक्रीटच्या विळख्यात आहेत.
या झाडांना काँक्रीटमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यानुसार या विभागांच्या वतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार ९०५८ झाडांना काँक्रीटपासून मुक्तता मिळणार असून या मोहिमेला सुरुवात देखील करण्यात आली आहे.
प्रभाग समितीनिहाय वृक्षांची संख्या
प्रभाग समिती वृक्षांची संख्या
(सिमेंट काँक्रीट/ अस्फाल्ट )
माजिवडा-मानपाडा १४५२
वर्तकनगर १९०४
लोकमान्य-सावरकर नगर ५९१
वागळे ८३९
उथळसर १६९४
नौपाडा-कोपरी १३६४
कळवा ६६३
मुंब्रा २७३
दिवा २०८
———————————————————-
एकूण ९०५८