मीरा-भाईंदरमध्ये ९०.७३ टक्के मतदान

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

भाईंदर: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. या निवडणूक रिंगणातील आठ उमेदवारांसाठी जिल्ह्यातील १४,६८३ शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळाला होता. मीरा-भाईंदर शहरामध्ये १०७८ मतदारांपैकी ९७९ मतदान झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मतदानासाठी सज्ज झालेल्या ठाणे जिल्ह्यातील २० मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात १४,६८३ शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यामध्ये ८,७६७ स्त्री मतदार असून ५,९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी कोकणातील तब्बल ३७,७१९ शिक्षकांना मतदानाचा हक्क मिळाला.

कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत नशिब अजमावत असलेल्या आठ उमेदवारांना या मतदारांकडून मतदान झाले. मतपत्रिकेव्दारे पसंती क्रमांकाव्दारे मतदान करण्यासाठी भाईंदर पश्चिमेला तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्रावर रांग लावून मतदान करण्यात आले. संध्याकाळी ४ नंतर भाईंदरमध्ये १०७८ पैकी ९७९ मतदारांनी मतदान केल्याचे सूत्रांनी सांगितले.