नऊ कोटी 35 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

ठाणे : विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल मूळ तक्रारदारांना पोलिसांनी सोमवारी परत केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत नऊ कोटी 35 लाख 38,445 रुपयांचा हस्तगत मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यात आला.

सोमवारी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणे आणि भिवंडी परिमंडळातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला एकूण नऊ कोटी 35 लाख 38,445 इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत करण्यात आला. त्यात दोन कोटी 20 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोनसाखळी आणि इतर सोन्याचे दागिने परत करण्यात आले. या गुन्ह्यांसोबत मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन कोटी 97 लाख 50 हजार रुपये किमतीचे दुचाकी व इतर वाहने तक्रारदारांना परत देण्यात आली. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गुन्ह्यातील 28 लाख 28 हजार रुपयांच्या मुद्देमाल परत करण्यात आला. प्रॉपर्टी मसिंगच्या गुन्ह्यातील एक कोटी 57 लाख 85 हजाराचा तर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत 15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना परत दिला. विविध गुन्ह्यात हस्तगत केलेली एक कोटी सात लाख 89 हजाराची रोकड व इतर गुन्ह्यात हस्तगत एक कोटी आठ लाख 71 हजाराचा मुद्देमाल देखील पोलिसांनी तक्रारदारांना परत केला आहे.