घोडेबाजार झाल्याची जोरदार चर्चा
ठाणे: कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यातून ८८.८९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत घोडेबाजार झाला असून एका मताचा भाव दोन हजार ते पाच हजार इतका लावण्यात आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि शिवसेना-भाजपा युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात होते. खरी लढत श्री.पाटील आणि श्री. म्हात्रे यांच्यात होणार आहे. ८६ मतदान केंद्रांवर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील ३८,५२९ मतदार आहेत त्यापैकी ठाणे जिल्ह्यात १५,३०० मतदार असून १३,५९५ म्हणजे ८८.८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपा-शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली होती. विद्यमान शिक्षक मतदार संघातील आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून या जागेवर कब्जा मिळविण्यासाठी शिंदे गट आणि भाजपाने ठाण्यात मेळावा घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते तर महाविकास आघाडीने देखिल ठाण्यात बैठक घेऊन श्री. पाटील यांना विजयी करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली होती. आज शिक्षकांना मोटारगाड्यांनी मतदान केंद्रांवर आणण्यात आले होते. त्यांना जेवण-नाश्ता पुरविण्यात आला तसेच प्रत्येक मताला दोन ते पाच हजार रुपयांचे पाकीट देखील देण्यात आले असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. काही शिक्षण संस्थांना झेरॉक्स मशीन, लॅपटॉप पुरविण्यात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते.
ठाण्यातील मतदान केंद्रांवर भाजपचे आ, संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच महाविकास आघाडीचे आ. जितेंद्र आव्हाड आणि पदाधिकारी उपस्थित राहिले होते. शिक्षकांना मतदान करण्याचे दोन्ही पक्षातील पदाधिकारी आवाहन करत होते. महाविकास आघाडी आणि भाजपा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पैसे देऊन मते घेतल्याचा इन्कार केला आहे.