ठाणे जिल्ह्यात ८४.६३ कोटींची खरेदी; शहापुरात सर्वाधिक जोर

आधारभूत भातखरेदी योजना

किन्हवली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्यातर्फे आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शहापुरात ३१ मार्चपर्यंत ५७ कोटी ५० लाखाची भात खरेदी करण्यात आली असून १३ केंद्रावर सात हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल दिला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भात खरेदी जोरात झाल्याचे दिसून आले असून खरेदी केंद्रातही वाढ करण्यात आली.

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत दरवर्षी शहापुरात भातखरेदी केली जाते. उपप्रादेशिक कार्यालय शहापूर यांच्यातर्फे शहापूर, मुरबाड, कर्जत येथे भात खरेदी केली जाते. चालू हंगामात शहापूर तालुक्यात १३ केंद्र देण्यात आली होती. यामध्ये आठ आदिवासी सोसायटी संस्थांचा समावेश होता तर पाच केंद्रे महामंडळातर्फे ठेवण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यापासून भात खरेदीला सुरुवात झाल्यानंतर ३१ मार्च २०२३ अखेर ठाणे जिल्ह्यात ८४ कोटी ६३ लाख रुपयांची भात खरेदी करण्यात आली. यातील एकट्या शहापुरात ५७ कोटी ५० लाखाची खरेदी झाली. जिल्ह्यातील एकूण ११,१२९ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल दिला असून शहापुरात सात हजाराहून अधिक शेतकरी आहेत. मुख्य म्हणजे पळशीन संस्थेतील खर्डी केंद्रात सर्वात जास्त १३ कोटी ३७ लाखांची भातखरेदी झाली असून खर्डी संस्थेच्या उंबरखाड केंद्रात सर्वात कमी भातखरेदी झाली आहे. एक कोटी २५ लाखाची खरेदी या केंद्रात झाली आहे.

यावर्षी पळशीन, आटगाव, सापगाव, डोळखांब, मुगाव, साकडबाव, बोरशेती, खर्डी या संस्थांनी भातखरेदी केली आहे. शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यातर्फे भात खरेदीवर देखरेख ठेवण्यात आली. प्रत्येक भातखरेदी केंद्रावर महामंडळाचे विपणन निरीक्षक आणि प्रतवारीकार नेमण्यात आले होते. मुख्य म्हणजे भात खरेदीबाबत यावर्षी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.