ठाणे जिल्ह्यासह मुंबई विभागातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येला जाणार

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

नवी मुंबई: सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेन ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी येथून रवाना होणार आहेत.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरीक जे 60 वर्षे किवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 आणि महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्हयातून 150, मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्हयातून 471 इतके अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्हयातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.

यासाठी सदर विशेष ट्रेन 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:30 वाजता मुंबई येथून रवाना होईल व 8 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल. सदर योजनेसाठी उत्पनाची अट 2.5 लाख आहे. वैद्यकीय दाखला, वयाचे 60 वर्ष पूर्ण इ. अटी आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर इ. साठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातून एकूण 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.